पुणे

Pune News : उड्डाणपूल-ग्रेड सेपरेटर बीआरटीच्या मुळावर

Laxman Dhenge

पुणे : शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा प्रमुख घटक असलेल्या पीएमपी बसचा प्रवास जलद गतीने व्हावा, यासाठी शहरात विविध तेवीस रस्त्यांवर बीआरटी प्रकल्पांचे नियोजन करण्यात आले. मात्र, ज्या रस्त्यावर बीआरटीचे नियोजन आहे, त्याच रस्त्यावर उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर उभे करून बीआरटीला नख लावण्याचे काम करण्यात आले आहे.

सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणार्‍या नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये, त्यांना कमी वेळेत इच्छितस्थळी पोहोचता यावे, नागरिकांना स्वस्त आणि जलद सेवा मिळावी, यासाठी महापालिकेने शहराचा सर्वंकष वाहतूक आराखडा तयार केला. या वाहतूक आराखड्यानुसार महापालिकेने अहमदाबादच्या धर्तीवर शहरातील विविध 23 रस्त्यांवर बीआरटी प्रकल्प राबविण्याचा निर्णय 2006 मध्ये घेतला. हा प्रकल्प शहरात राबविण्यात तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी यांचे मोठे योगदान लाभले. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजनेतून सुमारे एक हजार कोटींचा निधी मिळाला.

बीआरटी प्रकल्पाची सुरुवात हडपसर ते स्वारगेट आणि स्वारगेट ते कात्रज अशा 17 किलोमीटर या दरम्यान करण्यात आली. ही बीआरटी शास्त्रीय पद्धतीने न राबवता केवळ सायकल ट्रॅक, फुटपाथ, दुभाजक आणि बसथांबे यावर कोट्यवधींचा खर्च करण्यात आला.
कालांतराने प्रशासनाने आणि सत्ताधार्‍यांचे प्रकल्पाकडे दुर्लक्ष झाले. 'बीआरटी' सुधारण्याचे आश्वासने देऊन काही पक्ष सत्तेवर आले. मात्र, कोणत्याही सत्ताधार्‍यांनी बीआरटीचे जाळे वाढवण्यासाठी ठोस कार्यक्रम राबवला नाही. केवळ केंद्राचे अनुदान प्राप्त करण्यासाठी हा प्रकल्प जिवंत ठेवण्याचे काम करण्यात आले.

शहरात 117 किमी लांबीचे बीआरटी प्रकल्प कण्याचे नियोजन असताना केवळ 26 कि.मी. लांबीचा बीआरटी मार्ग करण्यात आला. त्यामध्ये संगमवाडी ते विश्रांतवाडी, येरवडा ते खराडी (आपले घर) स्वारगेट ते हडपसर आणि स्वारगेट ते कात्रज या मार्गांचा समावेश आहे. हडपसर ते स्वारगेट या दरम्यानच्या बीआरटी गुंडाळली आहे. काही ठिकाणी केवळ अवशेष दिसतात. संगमवाडी ते येरवडा या दरम्यानचा बीआरटी मार्ग तयार करून काही महिन्यांतच मोडीत काढण्यात आला. आता नगर रस्त्यावरील बीआरटी काढण्यात आली आहे. दरम्यान, खासगी वाहतुकीवर बीआरटीचा परिणाम होणार आहे, हे लक्षात घेऊन सुरुवातीपासून लोकप्रतिनिधी व राजकीय मंडळींचा या प्रकल्पाला विरोध होता.

राजकीय दबावाला बळी पडत प्रशासनाने काम करण्यास प्राधान्य दिल्याने नियोजित केलेल्या 23 मार्गांपैकी 15 ठिकाणी उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर उभारून बीआरटी मार्गाला अडथळा निर्माण करण्याचे काम करण्यात आले आहे. या प्रकल्पांमुळे संबंधित रस्त्यावर बीआरटी विकसित करणे शक्य नाही. त्यामुळे उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटर बीआरटीच्या मुळावर उठल्याचे सिद्ध झाले आहे.

बीआरटी मार्गावर अडथळा असलेली ठिकाणे

  • सातारा रस्ता : पद्मावती, कात्रज, अरण्येश्वर
  • सोलापूर रस्ता : सेव्हनलव्ह्ज, मगरपट्टा, हडपसर
  • अहमदनगर रस्ता : रामवाडी, गुंजन
  • सिंहगड रस्ता : पासलकर चौक, धायरी
  • कर्वे रस्ता : कर्वेनगर
  • संचेती ते विद्यापीठ : विद्यापीठ चौक, इस्क्वेअर, कृषी महाविद्यालय
  • बाणेर रस्ता : बाणेर

बीआरटी प्रकल्पासाठी केंद्राकडून एक हजार कोटीचा निधी मिळाला. या निधीतून शहरात शंभर ते सव्वाशे कि.मी. लांबीच्या रस्त्यावर बीआरटी प्रकल्प होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र पंचवीस किमी बीआरटी झाली. उर्वरित नियोजित बीआरटी मार्गावर उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर यांसारखे अडथळे निर्माण करण्यात आले. आता तर केवळ सात किमी बीआरटी शिल्लक ठेवली आहे. महापालिकेने आपल्याच सर्वांकष वाहतूक आराखड्याचे उल्लंघन केले आहे. हे असेच होत राहिले, तर आपण वाहतूक आराखड्याचे ध्येय गाठू शकणार नाही.

– प्रांजली देशपांडे-आगाशे, वाहतूक अभ्यासक.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT