पुणे

Pune News : 8 हजार वर्षांपूर्वीच्या मानवी वस्तीचा शोध

Laxman Dhenge

पुणे : हरियाणा राज्यातील हिस्सारजवळील राखी गढी येथे आजवरचे सर्वात जुने, इसवी सन आठ हजार वर्षांपूर्वीचे मानवी वस्ती असल्याचे पुरावे सापडले आहेत. दिल्ली येथील भारतीय पुरातत्त्व विभाग आणि पुणे येथील डेक्कन कॉलेजच्या संशोधकांचे हे मोठे यश मानले जात आहे. राखी गढीवर आजवर तीन संशोधकांनी संशोधन केले. यात पहिले संशोधन भारतीय पुरातत्त्व विभागाचे डॉ. अमरेंद्र नाथ यांनी केले. त्यावेळी राखी गढीत उत्तर हडप्पा संस्कृतीचे पुरावे सापडे होते. तो काळ इसवी सन पूर्व अडीच हजार वर्षांपूर्वीचा होता.

त्यानंतर पुण्यातील डेक्कन कॉलेजचे प्रा. वसंत शिंदे यांच्या टीमने अलीकडच्या काळात संशोधन केले. त्यांना यात मोठे यश मिळाले. त्यांनी ही संस्कृती 4 हजार वर्षांपेक्षा जुनी असू शकते, याचे पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली. त्याचे काही दाखलेही मिळाले होते. त्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून राखी गढीवर भारतीय पुरातत्त्व विभाग व डेक्कन कॉलेजने एकत्रित काम सुरू केले. यात पुरातत्त्व विभागाचे सहसंचालक डॉ. संजय कुमार व डेक्कन कॉलेजचे प्रा. डॉ. प्रबोध शिरवळकर यांचा समावेश आहे.

आठ हजार वर्षांपूर्वीच्या वस्तू सापडल्या

डेक्कन कॉलेजचे प्रा. शिरवळकर हे गेल्या दोन वर्षांपासून राखी गढीवर संशोधन करीत आहेत. ते म्हणाले, हडप्पन संस्कृतीचे तीन भाग आहेत. पूर्व हडप्पा, मध्यम हडप्पा व उत्तर हडप्पा (मॉडर्न) पूर्वीच्या दोन उत्खननात मध्यम व मॉडर्न या मानवी संस्कृतीचे पुरावे सापडले होते. तोवर 4 हजार वर्षांपर्यंतच्या काळातील हे पुरावे होते. आता मात्र जे पुरावे सापडले आहेत त्यानुसार ही संस्कृती तब्बल 7 ते 8 हजार वर्षे जुनी असल्याचे दाखले आहेत. मी केलेल्या कामाचा अंतिम अहवाल करण्याचे काम सुरू आहे. मात्र, यावर अजून बरेच दिवस संशोधन सुरू राहील.

माणसाच्या 'डीएनए'मध्ये फरक नाही

7 ते 8 हजार वर्षांपूर्वीचा माणूस अन् आजच्या माणसात काही फरक आहे काय, त्याच्या 'डीएनए'मध्ये बदल झाला काय? या प्रश्नावर प्रा. शिरवळकर म्हणाले, माणसाचा 'डीएनए' आठ हजार वर्षांपासून तसाच आहे. कारण, जेव्हा मानवी सापळे येथे सापडले त्याची सखोल चाचणी केली गेली. त्यातून हा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला आहे. येथे मोठी दफनभूमीच सापडली. यात मानवी सापळ्यांसह जनावरांचे सापळे आहेत.

सोने, चांदीसह विविध धातूंची भांडी सापडली

या ठिकाणी सोने, चांदीसह तांब्यापासून तयार केलेले दागिनेही सापडले आहेत. सर्वात सुंदर आहेत ती मातीची भांडी. त्या काळातला डिनर सेट सापडला आहे. मातीच्या भांड्यावर डॉ. शिरवळकर यांनी विशेष संशोधन केले असून, त्यांचा अहवाल अंतिम टप्प्यात आहे.

2 ते 6 शयनकक्षाची घरे सापडली

शयनकक्ष, स्वयंपाकघर या शब्दांचा जन्म अलीकडच्या काळातला आहे, असे आपल्याला वाटते; पण राखी गढीत आजवरच्या सर्वात मोठ्या प्राचीन घरांची भली मोठी वस्तीच जमिनीखाली सापडली. यात अंगण, ड्रेनेज सिस्टीमही सापडली. 2 ते 6 शयनकक्षाची घरेही त्याकाळी होती. त्या काळातील लोकांची कपड्याची फॅशनही कळते. यात एक रंगीत जीर्ण झालेल्या कापडाचा तुकडा, शाल आणि स्कर्ट सापडला आहे.

योगाचे ज्ञान त्या काळापासून…

सात ते आठ हजार वर्षांपासून आपल्या देशात योग लोक करीत असत, असे पुरावे सापडले आहेत. कारण, त्या काळातील काही शिक्क्यांवर योगमुद्रेत बसलेल्या स्त्रिया व पुरुषांची चित्रे आहेत. तसेच वाघ, गेंडा, युनिकॉर्न बैल, हत्ती यांचीही चित्रे आहेत.

भारतात 8 हजार वर्षांपूर्वी मानवी वस्ती यावर एकमत

आतापर्यंत सर्वात जुनी मानवी वस्ती चार ते साडेचार हजार वर्षांपूर्वीची होऊन गेल्याचे पुरावे होते. या संशोधनाने हडप्पा संस्कृती 7 ते 8 हजार वर्षे जुनी असल्याचे सबळ पुरावे तिसर्‍या संशोधनात सापडले आहेत. यावर आता भारतीय पुरातत्त्व विभाग व डेक्कन कॉलेजच्या शास्त्रज्ञांनी मिळून काम केले आहे. आपल्या देशात 8 हजार वर्षांपूर्वी मानवी वस्ती होती यावर एकमत झाले आहे. त्या काळातील लोक आजच्या इतकेच प्रगत असल्याचे पुराव्यांवरून जाणवते. हे संशोधन करीत असताना खूप खोलात जाऊन काम करता आले त्याचा आनंद वाटतो.

– प्रा. डॉ. प्रबोध शिरवळकर, डेक्कन कॉलेज, पुणे

हेही वाचा

SCROLL FOR NEXT