पुणे

Pune News : तेव्हा देश मोठा वाटला नाही का : सुषमा अंधारे

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : 'माजी मंत्री नवाब मलिक यांना बरोबर घेताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा वाटतो, मग डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर प्रकरणाच्या वेळी त्यांना देश मोठा वाटला नाही का?' असा सवाल शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. 'दुष्काळ, अवकाळी पाऊस, शेतकर्‍यांचे प्रश्न आदींवरून नागरिकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी फडणवीसांनी मलिक यांच्याबाबत पत्र लिहिले आहे,' असेही त्या म्हणाल्या. भाजपचा प्रवास लोकतंत्र येईल किंवा जाईल, सत्ता टिकली पाहिजे, असा सुरू असल्याची टीकाही अंधारे यांनी केली.

पुणे शहर शिवसेना कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या वेळी शहरप्रमुख गजानन थरकुडे उपस्थित होते. अंधारे म्हणाल्या की, 'हिवाळी अधिवेशनामध्ये राज्यातील महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी काहीतरी होईल, मराठा ओबीसी आरक्षण, अवकाळी पाऊस, आरोग्य विभागातील गैरव्यवहार, ललित पाटील यावर चर्चा होणे अपेक्षित असताना, फडणवीस यांनी नागरिकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी मलिक यांच्याबाबतचे पत्र बाहेर काढले. ज्या अजितदादांना फडणवीस वारंवार भेटतात, बोलतात त्या अजितदादांना पत्र लिहिण्याची गरज काय होती?

नवाब मलिक यांना प्रकृतीच्या कारणामुळे जामीन मंजूर झाला. त्यांची प्रकृती पूर्वीही चांगली नव्हती. मात्र, अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर मलिक यांचा जामीन मंजूर झाला, हे विसरता येणार नाही. संजय राठोड यांच्याविरोधात भाजपमधील आक्रस्ताळ्या महिला नेत्या पुढे आल्या, आरोप केले. त्या वेळी आम्ही त्यांचा राजीनामा घेतला. त्याच राठोडांच्या मांडीला मांडी लावून फडणवीस सत्तेत बसले आहेत. किरीट सोमय्या यांनी ज्यांच्यावर आरोप केले, ते सत्तेत सहभागी झालेले आहेत. ज्यांनी भाजपला सत्तेवर आणले, त्यांना फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाच्या महत्त्वाकांक्षेपोटी सत्तेबाहेर ठेवले.

ड्रगप्रकरणी कठोर कारवाई करावी

ससून रुग्णालयातील ललित पाटील ड्रगप्रकरणी डॉ. मरसाळे, डॉ.देवकाते यांना अटक झाली. यातला एकही प्रमुख नाही. यात डॉ. संजीव ठाकूर शेवटची कडी नाही. कारागृहातून या गोष्टी चालतात. कारागृह निरीक्षक, महानिरीक्षक यांच्यावर काय कारवाई करणार? हे सांगावे. तसेच ड्रगचे नेक्सस कधी बाहेर येणार आहे? याबाबत देखील माहिती द्यावी, अशी मागणी अंधारे यांनी केली.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT