पुणे : पुढारी वृत्तसेवा : अवकाळी पावसामुळे 1 हजार 293 हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. त्यामध्ये पाच जिल्ह्यांतील प्रामुख्याने भातासह कडधान्य, तृणधान्य, ज्वारी, द्राक्ष आणि भाजीपाला पिकाचा समावेश असल्याची माहिती कृषी आयुक्तालयातून सोमवारी देण्यात आली. 1 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबरपर्यंतच्या शेती व फळपिकांच्या बाधित क्षेत्राचा प्राथमिक नजरअंदाज अहवाल कृषी आयुक्तालयास प्राप्त झालेला आहे.
त्यानुसार आयुक्तालयाने याबाबतचा अहवाल कृषी मंत्रालयास सोमवारी (दि.13) सादर केला. त्यामध्ये ही माहिती देण्यात आलेली आहे .रायगड जिल्ह्यातील पेण, खालापूर, कर्जत, माणगाव, रोहा, सुधागड पाली, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन तालुक्यातील 972 हेक्टरवरील भाताच्या पिकास अवकाळीने तडाखा दिला. कल्याण तालुक्यात 22 हेक्टरवरील कडधान्य व तृणधान्यांची पिके बाधित झालेली आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात 30, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 114 हेक्टरवरील भाताचे नुकसान झाले. सांगली जिल्ह्यातील वाळवा, आटपाडी, कवठे महांकाळ तालुक्यातील 155 हेक्टरवरील ज्वारी, द्राक्षे,भाजीपाला पिके बाधित झाली. पुणे जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यांतील पिकांच्या नुकसानीचा अहवाल प्राप्त झाला नसल्याचे सांगण्यात आले.
राज्यात नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळीच्या पावसाने ऐन काढणीच्या अवस्थेत असलेल्या विशेषतः कोकणातील जिल्ह्यातील भात पिकाला फटका बसला आहे. क्षेत्रीयस्तरावर महसूल आणि कृषी विभागाकडून अवकाळीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. दिवाळी सणानंतर अंतिम अहवाल क्षेत्रीयस्तरावर प्राप्त होण्याची अपेक्षा असल्याने नुकसानग्रस्त पिकांच्या क्षेत्राचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
दिलीप झेंडे, कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण), कृषी आयुक्तालय, पुणे.
हेही वाचा