मुंबई : कीर्तीकर-कदम वाद विकोपाला; मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढली | पुढारी

मुंबई : कीर्तीकर-कदम वाद विकोपाला; मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढली

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : रामदास कदम यांनी माझ्यावर गद्दारीचा संशय व्यक्त केला आहे, पण रामदास कदम यांच्या गद्दारीचा इतिहास जुना असून त्यांनी यापूर्वी 1990 मध्ये आपल्या पराभवासाठी अनेक प्रयत्न केले होते, असा पलटवार शिवसेना खासदार गजानन कीर्तीकर यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर केल्याने दोघांतील वाद आणखी वाढला आहे.

रामदास कदम यांनी गजानन कीर्तीकर यांना वायव्य मुंबईतून लोकसभेचे तिकीट देण्यास विरोध केला आहे. कदम यांचे पूत्र हे उद्धव ठाकरे गटात आहेत. ते ठाकरे गटाकडून लोकसभेचे दावेदार आहेत. अशावेळी गजानन कीर्तीकर यांना तिकीट दिले तर ते तिकीट घेऊन मुलासाठी घरात बसतील आणि पक्षाशी गद्दारी करतील, असा संशय व्यक्त केला आहे. कदम यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना कीर्तीकर म्हणाले, की आगामी लोकसभा निवडणूक लढण्यास आपण सक्षम असून आपण साडेतीन लाख मताधिक्क्याने जिंकून येऊ. रामदास कदम यांचा गद्दारीचा इतिहास फार मोठा आहे. 1990 च्या विधानसभा निवडणुकीत मालाड मतदारसंघातून त्यांनी मला पाडण्यासाठी भरपूर अयशस्वी प्रयत्न केले. खेड ते पुणे प्रवासात त्यांनी शरद पवार यांच्या गाडीत बसून राष्ट्रवादीत प्रवेश करण्याबाबत चर्चा केली होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अनंत गीते यांना पाडण्यासाठीही भरपूर निष्फळ प्रयत्न केले. महापालिका निवडणुकीत कांदिवली पूर्व प्रभागातून त्यांचा सख्खा भाऊ सदानंद कदम शिवसेनेतून निवडणूक लढत असताना, त्यांना निवडून आणू नका, म्हणून रामदास कदम सर्व कार्यकर्त्यांना दमबाजी केली होती, हे सर्वांना माहीत असल्याचेही कीर्तीकर म्हणाले.

कदम यांचा मुलगा सिद्धेश कदम याला लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. त्यामुळे ते खोट्या बातम्या प्रसिद्ध करून वातावरण बिघडवण्याचा निष्कळ प्रयत्न करीत आहेत. मात्र, त्यांच्या दबावतंत्राला शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बळी पाडणार नाहीत. त्याचमुळे वैफल्यग्रस्त झालेले रामदास कदम आदळापट करीत आहेत. ते पक्ष नेतृत्वाच्या आणि जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी हे निष्फळ प्रयत्न थांबवावेत, असा इशाराही कीर्तीकर यांनी कदम यांना दिला आहे.

कदम यांचा पलटवार

रामदास कदम यांनी कीर्तीकर यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. 1990 साली मी पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कीर्तीकर करत आहेत. पण 1990 मध्ये मी कांदिवलीचा शाखाप्रमुख होतो. शिवसेनाप्रमुखांनी मला खेडमधून उमेदवारी दिली होती. खेडमध्ये मी उमेदवार असताना यांना पाडायला कधी आलो, असा सवाल कदम यांनी केला. कांदिवलीत मी शाखाप्रमुख असल्याने मी केलेल्या कामावर ते निवडून आले. पण ते अमान्य करून आपली बेईमानी गजानन कीर्तिकर दाखवून देत आहेत. अनंत गिते यांनी 2009 मध्ये उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरुन मला गुहागरमध्ये पाडले होते. त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत मी सांगितले की मी गितेंचे काम करणार नाही. आपल्या मुलाला निवडून आणण्यासाठी कीर्तीकर हे पक्षासोबत गद्दारीचे काम करत आहेत. त्यामुळे शरद पवारांना भेटल्याचा आरोप करत आहेत. मी पवारांना भेटल्याचे स्वप्न पडले असावे, असे कदम म्हणाले. तसेच गजाभाऊचे वय झाल्याने ते भ्रमिष्ट होऊन आरोप करत असल्याचा टोला कदम यांनी लगावला आहे. मात्र पक्षाच्या दोन ज्येष्ठ नेत्यांमध्येच लोकसभेच्या तिकिटावरून वाद विकोपाला गेल्याने मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढली आहे.

Back to top button