Pune Drugs Case : ड्रग प्रकरणात आणखी चार आरोपींची नावे

Pune Drugs Case : ड्रग प्रकरणात आणखी चार आरोपींची नावे

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ड्रग तस्करी प्रकरणात ललित पाटीलच्या आणखी चार सहकार्‍यांची नावे पोलिस तपासात निष्पन्न झाली आहेत. हे सर्व आरोपी सध्या राज्यातील विविध कारागृहांत आहेत. त्यांना प्रॉडक्शन वॉरंटद्वारे मंगळवारी (दि. 14) पुण्यात आणले जाणार आहे. दरम्यान, ललित पाटील, रोहन चौधरी आणि शिवाजी शिंदे यांच्या कोठडीत विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयाने सात दिवसांची वाढ केली आहे.

ड्रग तस्कर ललित पाटील प्रकरणात आतापर्यंत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने एकूण 14 आरोपी निश्चित केले असून, त्यापैकी 11 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. सध्या ललित पाटील, शिवाजी शिंदे व रोहितकुमार चौधरी हे तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, उर्वरित आठ आरोपी न्यायालयीन कोठडीत येरवडा कारागृहात आहे. तर, मुंबई पोलिसांच्या गुन्ह्यात तीन आरोपी हवे आहेत. संबंधित सर्व आरोपींचा एकत्रित तपास करण्याच्या दृष्टीने दहा आरोपींचे प्रोडक्शन वॉरंट घेऊन त्यांना ताब्यात घेऊन ड्रग तस्करीची चौकशी केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.

सरकारी वकील चंद्रकिरण साळवी यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, आरोपीनी ड्रगनिर्मितीचा कट कशाप्रकारे रचला, त्यांनी ड्रगचे उत्पादन कसे घेतले, त्यांचे अन्य साथीदार कोण आहेत, याबाबत एकत्रित तपास करणे आवश्यक आहे. त्याकरिता सर्व आरोपींची एकत्रित पोलिस कोठडी महत्त्वपूर्ण आहे. बचाव पक्षाच्या वतीने अ‍ॅड. संदीप बाली, अ‍ॅड. विवेक राजपुरे, अ‍ॅड. सचिन ताठे यांनी बाजू मांडली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news