पुणे

Pune News : बालके होताहेत गुटगुटीत

Laxman Dhenge

पुणे : पुणे जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यासाठी अनोखा उपक्रम राबविण्यात आला. ग्राम बालविकास केंद्रामध्ये ठेवण्यात आलेल्या कुपोषित बालकांना चांगलेच बाळसे आले असून, 762 बालके हे कुपोषण मुक्त झाली. केंद्रातील एकूण मुलांपैकी हे प्रमाण 80 टक्के असून, राज्यातील हा पहिलाच प्रयोग होता. जिल्हा परिषदेने राबविलेला हा प्रयोग यशस्वी ठरला असून, तो पुढे ही राबवून कुपोषण मुक्तीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील तीव— कुपोषित (सॅम) आणि मध्यम कुपोषित (मॅम) बालकांना एकत्रितपणे अंगणवाडीमध्ये ठेवण्यात आले. ज्या-ज्या अंगणवाडीमध्ये बालकांना ठेवण्यात आले, त्या ठिकाणाला ग्राम बालविकास केंद्र असे नाव देण्यात आले. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून ग्राम बालविकास केंद्रात बालकांना दाखल करून त्यांना आहार आणि औषधोपचार करण्यात आला. जिल्हा कुपोषण मुक्त करण्याचा हा निर्धार घेऊन जिल्हा परिषदेने ग्राम विकास बाल केंद्र सुरू केले आहेत.

कुपोषित बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात. शून्य ते सहा वयोगटातील मुलांमधील हे कुपोषण टाळण्यासाठी मुलांना चौरस आहार देण्यात येणार आहे. या मुलांच्या पोषणासाठी अंगणवाडी सेविकांना आगाऊ स्वरूपात जिल्हा परिषदेने निधी देण्यात येतो. या केंद्रामध्ये बालकांना 8 वेळा पौष्टिक आहार व आवश्यक औषधे देण्यात आली आहेत. कुपोषित बालकांना दैनंदिन आहार, औषधे आणि त्यांचे दररोज मॉनिटरिंग केले जाते. याशिवाय शनिवारी व रविवारी या सुटीच्या दिवशी तालुक्यातील अधिकार्‍यांना दुसर्‍या तालुक्यात जाऊन प्रत्यक्षात पाहणीची जबाबदारी देण्यात येते. तालुका आरोग्य अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली औषधोपचार केले जातात.

आहारामध्ये काय असते…?

ग्राम बाल विकास केंद्रामध्ये देण्यात येणार्‍या आहारामध्ये नाचणी खीर, गहुसत्व खीर, कोथिंबीर मुठीया, मेथी मुठीया, मसाला इडली, थालीपीठ, केळी, मुरमुरा लाडू इ. पदार्थांचा समावेश असणार आहे.

दोन टप्प्यांत 812 केंद्र

जिल्ह्यात दोन टप्प्यांमध्ये ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्यात आली. पहिल्या टप्प्यात 532 आणि दुसर्‍या टप्प्यात 280 केंद्र सुरू करण्यात आले होते. यामध्ये अनुक्रमे 894 आणि 346 बालकांना ठेवण्यात आले होते. त्यामधील पहिल्या टप्प्यात 677 आणि दुसर्‍या टप्प्यामध्ये 245 बालकांच्या श्रेणीमध्ये वाढ झाल्याचे महिला व बालकल्याण विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

ग्राम बालविकास केंद्रांमध्ये प्रत्येक अंगणवाडी सेविका, तालुक्यातील अधिकारी तसेच डॉक्टर यांनी चांगले काम
केले. म्हणून त्यांचे चांगले परिणाम दिसून आले. कुपोषण संख्येत घट झाली असून, ग्राम बालविकास केंद्र यापुढे ही टप्याटप्याने सुरू केली जाणार आहेत. – जामसिंग गिरासे,

जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी, जि. प.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT