शहाजीनगर येथील निरा भीमा कारखान्याच्या अध्यक्षपदी भाग्यश्री पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. छायाचित्रात हर्षवर्धन पाटील, उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे. 
पुणे

Pune News : निरा भीमा कारखान्याच्या अध्यक्षपदी भाग्यश्री पाटील

Neera Bhima Factory : कारखान्याची पाचव्यांदा बिनविरोध निवडणूक पार

पुढारी वृत्तसेवा

Neera Bhima Factory

बावडा : शहाजीनगर (ता.इंदापूर) येथील निरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी भाग्यश्री हर्षवर्धन पाटील यांची तर उपाध्यक्षपदी दादासाहेब उत्तम घोगरे यांची सोमवारी (दि. २८) बिनविरोध निवड करण्यात आली.

निरा भीमा कारखान्याची सन २०२५-३० साठी संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पडली. राज्यात सलग पाचव्यांदा बिनविरोध निवडणूक होणारा हा एकमेव कारखाना आहे. कारखाना कार्यस्थळावर शहाजी सभागृहामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी व उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्षपदासाठी भाग्यश्री पाटील (बावडा) व उपाध्यक्षपदासाठी दादासाहेब घोगरे (सुरवड) या दोघांचे अर्ज आल्याने बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

नूतन अध्यक्षा भाग्यश्री पाटील ह्या निरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका म्हणून गेली २० वर्षे काम करीत आहेत. तसेच इंदापूर तालुक्यातील इतर सहकारी संस्थांवरील त्या कार्यरत आहेत. भाग्यश्री पाटील यांचा इंदापूर तालुक्यातील राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमात गेली ३ दशके सक्रिय सहभाग राहिला आहे. या निवडीनंतर कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीमध्ये नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी मावळते अध्यक्ष लालासाहेब पवार, कारखान्याचे आजपर्यंतचे उपाध्यक्ष, आजपर्यंतचे संचालक मंडळ यांचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी अंकिता पाटील ठाकरे उपस्थित होत्या. या निवडीच्या बैठकीस कारखान्याचे संस्थापक संचालक हर्षवर्धन पाटील, लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, अँड. कृष्णाजी देवकर, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, प्रकाश मोहिते, संजय बोडके, राजकुमार जाधव, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, राजेंद्र देवकर, उमेश पाटील, महेशकुमार शिर्के, आनंदराव बोंद्रे, रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, संगीता पोळ, कल्पना शिंदे उपस्थित होते. कार्यकारी संचालक एन. ए. सपकाळ यांनी आभार मानले.

निरा भीमाचा भविष्यकाळ प्रगतीचा : हर्षवर्धन पाटील

याप्रसंगी बोलताना कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, जी व्यक्ती कारखान्याचे रोपटे लावते, वाढविते व हे रोपटे मोठे करताना किती त्रास व अडचणी असतात, हे रोपटे लावणाऱ्यासच माहीत असते. निरा भीमा कारखान्यावर शेतकरी सभासदांचा मोठा विश्वास कायम आहे. आगामी ५ वर्षांमध्ये कारखान्याची स्थिती कठोर निर्णय व नियोजन करून पूर्वपदावर आणावयाची आहे. आगामी काळ कारखान्यासाठी प्रगतीचा राहणार आहे. कारखान्याचा आगामी ५ वर्षांमध्ये पहिल्या ५ कारखान्यांमध्ये समावेश होईल, असे काम आपणास एकत्रितपणे व जबाबदारीने करायचे आहे. कारखान्याचा आगामी गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने यशस्वी होईल, असेही हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT