इंदापूर: पुण्यातील स्वारगेट एसटी बसस्थानकात झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर खबरदारी म्हणून इंदापूर येथील बसस्थानकामध्ये दिवसा महिला पोलिस रक्षकांची नियुक्ती करावी. तसेच आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता ठेवावी, अशा सूचना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पोलिस व नगरपरिषद विभागाला दिल्या.
हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी (दि. 3) बसस्थानकाला भेट देत पाहणी केली. तसेच उपस्थित प्रवाशांसोबत संवाद साधला आहे. या वेळी आगर व्यवस्थापक हनुमंत गोसावी, पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, मुख्याधिकारी रमेश ढगे, प्रा. कृष्णा ताटे, अर्बन बँकेचे संचालक स्वप्निल सावंत, दादासाहेब पिसे, अविनाश कोथमीरे, माजी नगरसेवक शेखर पाटील, अॅड. शरद जामदार, हमीद आत्तार, अमोल खराडे, कपिल पाटील, अमर लेंडवे, गणेश रोडे, अमोल कारंडे, गणेश कांबळे, मनोज काळे, दत्ता पांढरे, माऊली चौधरी आदी यावेळी उपस्थित होते.
पाटील यांनी बसस्थानकावर उभ्या असलेल्या बसमध्ये जात विद्यार्थिनी, प्रवाशांसोबत संवाद साधला. त्यांच्या अडीअडचणी व समस्यांबाबत विचारणा केली. इंदापूरचे बसस्थानक अत्यंत रहदारीचे ठिकाण असून, जवळच शाळा, महाविद्यालये असल्याने विद्यार्थिनी मोठ्या संख्येने बसस्थानकावर असतात. काही प्रमाणात बसस्थानकात अस्वच्छता दिसून आली. आरोग्याच्या दृष्टीने तत्काळ बसस्थानक आणि नगरपरिषदेने या ठिकाणी स्वच्छतेवर भर द्यावा आणि ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचनाही पाटील यांनी या वेळी दिल्या.
गाळेधारकांनी वाचला तक्रारींचा पाढा
बसस्थानकातील गाळेधारकांनी त्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल पाटील यांच्या पुढे तक्रारी मांडल्या. तळमजल्यातील ड्रेनेजलाइन गेल्या 5 ते 7 वर्षांपासून बंद आहे. 2020 साली पुढील ड्रेनेजलाइन ब्लॉक असल्यामुळे तळमजल्यात चार ते पाच फूट पाणी साचले होते. त्यात सर्व दुकानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. आता बसस्थानक आवार व ड्रेनेजलाइनचे काम चालू आहे. त्यातच तळमजल्यातील ड्रेनेजलाइन नवीन टाकून घ्यावी किंवा साफ करून घ्यावी.
याशिवाय बसस्थानकातील व्यापारी गाळ्यांसमोर लावल्या जाणार्या बॅनरमुळे गाळेधारकांना त्रास होत आहे. हे बॅनर निषेध क्षेत्र करावे तसेच बसस्थानकावरील अतिक्रमणे तत्काळ हटवावीत, अशी मागणी प्रवाशांसह व्यापार्यांनी नगरपरिषदेकडे केली. यावर आगारप्रमुख गोसावी यांनी नगरपरिषद आणि पोलिसांच्या मदतीने ही अतिक्रमणे तत्काळ हटवली जातील, असे आश्वासित केले.