

पंढरपूर : शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे हे एकत्र आले तर महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टिने चांगलेच होईल. उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही बंधुनी सांगीतले आहेच की, त्यांचे मतभेद किंवा जे काही स्थानिक आपसातील विषय असतील ते संपवून जर ते एकत्र येत असतील तर निश्चितच त्यांचे आम्ही स्वागत करतो. असे माजी मंत्री व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी सांगीतले. तर याबाबत शरद पवार यांनी उध्दव ठाकरे व राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर बोलणे टाळत वेट अॅन्ड वॉचची भुमिका घेतली आहे.
पंढरपूर येथे राष्ट्रवादीच्या पदाधिकार्याच्या मुलाच्या लग्नसमारंभासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व शरद पवार आले होते. यावेळी पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. याप्रसंगी शरद पवार यांनी बोलणे टाळले. याप्रसंगी विजयसिंह मोहिते-पाटील, खा. धैर्यशील मोहिते-पाटील, आ. अभिजीत पाटील उपस्थित होते.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावरती प्रतिक्रिया देताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, ज्यावेळी महाराष्ट्रात दोन्ही ठाकरे बंधूंची ताकद एकत्र येईल आणि सर्व मराठी माणूस एकत्र येईल. त्यावेळी वेगळे काही सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील जनता त्यांची ताकद ओळखते. दोन्ही बंधू एकत्र येत असतील तर त्याचे आम्ही स्वागत करतो. दोन्ही भावांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.