पुणे

दुर्दैवी ! सळई डोक्यात पडल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बाणेर परिसरात गृहप्रकल्पाचे काम सुरू असताना लोखंडी सळई डोक्यात पडून पादचारी शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. या प्रकरणी बांधकाम व्यावसायिकासह अभियंत्याविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
रुद्र केतन राऊत (वय ९, रा. श्रीनाथ सोसायटी, वीरभद्रनगर, बाणेर) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत त्याची आई पूजा केतन राऊत (वय ३०) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ला कमर्शिअल गृहप्रकल्पाचे संचालक बांधकाम व्यावसायिक, तसेच अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा राऊत आणि त्यांचा मुलगा रुद्र बुधवारी (२२ नोव्हेंबर) दुपारी पावणे तीनच्या सुमारास शाळेतून घरी निघाले होते. वीरभद्रनगर परिसरात ला कर्मिशअल गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. त्या वेळी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतून लोखंडी सळईचा तुकडा रुद्र याच्या डोक्यात पडल्याने तो गंभीर जखमी झाला.सुदैवाने या घटनेत रुद्रची आई पूजा बचावल्या. त्यांना दुखापत झाली नाही. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती चतु:शृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची पाहणी केली. तेव्हा तेथे सुरक्षाविषयक उपाययोजना केल्या नसल्याचे आढळून आले. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या परिसरात जाळी बसविण्यात आली नव्हती. सुरक्षाविषयक उपाययोजना न करता दुर्घटनेस जबाबदार ठरल्या प्रकरणी बांधकाम व्यावसायिकासह अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे तपास करत आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT