

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आई, आत्मा आणि परमात्मा या तत्त्वांमध्ये अवघे विश्व सामावले आहे. त्यामुळे मानवी जीवनात या तीन्ही तत्त्वांना अधिक महत्त्व असून, त्यांना कधी अंतर देऊ नका, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कथाकार भागवत भूषण पंडित प्रदीप मिश्रा (सिहोरवाले) यांनी केले.
पाथर्डी गाव येथील दोंदे मळा येथे पालकमंत्री दादा भुसे यांच्या पुढाकारातून श्री शिवमहापुरण कथेचे आयोजन केले आहे. पंडित मिश्रा यांनी बुधवारी (दि.२२) कथामालेचे दुसरे पुष्प गुंफले. पंडित मिश्रा म्हणाले की, सृष्टीवर जन्म घेणाऱ्या प्रत्येक जिवाला काही ना काही समस्या अथवा दु:ख आहे. पृथ्वीतलावर मनुष्य म्हणून जन्म घेणाऱ्या भगवान राम व कृष्ण यांनाही त्यांच्या जीवनात दु:ख चुकलेले नाही. त्यामुळे दु:खाला सामोरे जाण्यासाठी भक्ती हाच एकमेव मार्ग आहे. भगवान शंकराची आराधना केल्यास दु:ख तसेच समस्यांचे निराकरण होण्यास मदत मिळते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
देशविघातक प्रवृत्ती भारताचे विभाजन करताना आपली संस्कृती नष्ट करू पाहत आहेत. सनातन धर्म कमकुवत करण्याचे षडयंत्र सुरू आहे. तसेच राजकारणीही त्यांच्या मतपेटीच्या स्वार्थापायी समाजात जातीभेदाच्या भिंती उभ्या करत आहेत. पण, खऱ्या जीवनामध्ये देव तसेच कोणताही धर्म जातीभेदाची शिकवण देत नाही. त्यामुळे समाजाने वेळीच या गोष्टी ओळखणे गरजेचे आहे. तसेच सनातन धर्म टिकवण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचेही मिश्रा यांनी सांगितले. कथेवेळी पंडित मिश्रा यांनी त्यांनी सादर केलेल्या भजनामध्ये शिवभक्त तल्लीन झाले. याप्रसंगी शिवमहापुरण कथेचे आयोजक पालकमंत्री दादा भुसे, अजय बोरस्ते, रंजन ठाकरे, नाना महाले, प्रवीण तिदमे यांच्यासह आयोजन समितीमधील विविध पदाधिकारी व भक्तपरिवार उपस्थित होता.
गोदेचे महत्त्व अधिक
पृथ्वीतलावर गंगा नदीला अवतरित करत तिचे गोदावरी नामकरण करण्याचे महान कार्य महर्षी गौतम ऋषी यांनी केले. पण गंगा-गोदावरीही शिवशंकराच्या सानिध्यात अविरत वाहत आहे. याच गोदावरीच्या स्नानाने तसेच तिच्या घाटावर भगवंतांच्या नामस्मरणाने जीवनात लवकर फलश्रुती प्राप्त होते, असे विचार पंडित मिश्रा यांनी त्यांच्या वाणीतून मांडले. बारा ज्याेर्तिलिंगाचे महत्त्व समान असून, तेथे छोटे-मोठे असा भेदभाव करू नये, असेही मिश्रा यांनी सांगितले.
हेही वाचा :