पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील दुष्काळी स्थितीमुळे मागेल त्याला शेततळे योजनेकडे शेतकर्यांचा कल वाढला आहे. त्यातून प्राप्त अर्जांच्या छाननीनंतर पूर्वसंमती दिलेल्या कामातून सद्य:स्थितीत 4 हजार 614 शेततळी तयार झालेली आहेत. त्यातून नव्याने साडेचार ते पाच हजार हेक्टरवरील पिकांना संरक्षित सिंचनाची सोय उपलब्ध झाली असून, संबंधितांना सुमारे 31 कोटी रुपयांचे अनुदान वाटप पूर्ण झालेले आहे.
राज्य सरकारने मागेल त्याला शेततळे योजनेसाठी 100 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केल्याची माहिती कृषी सहसंचालक (मृद संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन) पांडुरंग शेळके यांनी दिली. ते म्हणाले, महाडीबीटीवर शेततळे योजनेतील सहभागासाठी ऑनलाईनवर 1 लाख 76 हजार 272 शेतकर्यांचे अर्ज प्राप्त झाले. त्यामध्ये पात्र नसलेले अर्ज रद्द करण्यात आले असून, प्रत्यक्षात निवड झालेल्या शेतकर्यांच्या अर्जांची संख्या 1 लाख 12 हजार 569 इतकी आहे.
त्यानुसार शेततळ्यांसाठीची कागदपत्रे 29 हजार 129 शेतकर्यांनी ऑनलाईन अपलोड केलेली आहेत. त्याची छाननी होऊन 14 हजार 291 शेतकर्यांना शेततळी बांधण्यास पूर्वसंमती दिलेली आहे. त्यातील शुक्रवारअखेर (दि.17) 4 हजार 614 शेतकर्यांनी शेततळी तयार झालेली आहेत. या शेतकर्यांना सुमारे 30 कोटी 95 लाख रुपयांइतक्या अनुदानाचे थेट वाटप करण्यात आलेले आहे. सर्वाधिक शेततळी अहमदनगर जिल्ह्यात तयार झालेली असून ती 999 आहेत.
त्या खालोखाल नाशिक 733, सोलापूर 660 आणि पुणे जिल्ह्यात 499 शेततळ्यांचा समावेश आहे. आकारमानानुसार शेततळ्यांसाठी सुमारे 75 हजार रुपयांइतके अनुदान दिले जाते. शेततळ्यांची कामे पूर्ण होतील त्यानुसार शेतकर्यांना अनुदान देण्यासाठी शासनाकडून उर्वरित 60 कोटींच्या अनुदानाची मागणी करण्यात येईल.
पावसाचा खंड पडल्याने पिकांना संरक्षित सिंचनाची सोय उपलब्ध होण्यासाठी शेततळ्यांचा शेतकर्यांना चांगला आधार होत आहे. पिकांना ठिबक सिंचनाद्वारे किमान दोन ते तीन वेळा पाणी देण्यामुळे पिकांच्या उत्पादनाची शाश्वती राहते आणि वाजवी दर मिळण्यासही मदत होत आहे. तरी जास्तीत जास्त शेतकर्यांनी'मागेल त्याला शेततळे' योजनेचा लाभ घ्यावा.
– रवींद्र भोसले, मृद्संधारण संचालक, कृषी आयुक्तालय.
हेही वाचा