पुणे : वाहन प्रदूषणात पुणे शहर देशात दिल्ली पाठोपाठ दुसर्या क्रमांकावर आहे. धुलिकणांसह शहरातून रोज सुमारे 10 कोटी सिगारेटचा धूर निघतो. त्यामुळे नागरिकांना सतत पॅसिव्ह स्मोकिंगचाही धोका आहे. या दोन्ही कारणांमुळे शहरात सतत अस्थमाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे गर्दीतून जाताना सिगारेटचा धूरही तुमची फुफ्फुसे निकामी करीत आहे.
उच्चशिक्षित व सुजाण नागरिक अशी देशभरात पुणे शहराची ओळख आहे. असे असले तरीही शहरात रोज सुमारे दहा कोटी तर महिन्याला 300 कोटी सिगारेटचा धूर निघतो अशी धक्कादायक माहिती आहे. आधीच वाहनांसह खोदकामांमुळे धुलिकणांचे प्रदूषण प्रचंड वाढले आहे. त्यात पॅसिव्ह स्मोकिंगचाही मोठ्या प्रमाणावर नागरिकांना धोका वाढला आहे. त्यामुळे शहरात अस्थमाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
मार्च महिन्याच्या दुसर्या आठवड्यात धूम—पान दिन साजरा केला जातो. त्या निमित्ताने एका खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार पुणे शहरात महिन्याला 600 कोटींच्या सिगारेटची विक्री होते. या शहरात महिन्याला 300 कोटी सिगारेटचा धूर निघतो. गणित केले तर दररोज शहरात सुमारे 10 कोटी सिगारेटचा धूर निघतो. तो लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक व आजारी व्यक्तींसाठी अधिक धोकादायक आहे.
पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे. शिवाय आयटी हब आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागासह देशाच्या कानाकोपर्यातून इथे विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षणासाठी येतात. मुले व मुली असा भेद सिगारेट ओढण्याबाबत नाही. त्यामुळे शहरात किमान 200 पेक्षा जास्त कंपन्यांच्या सिगारेट मिळतात. रोज 10 कोटी सिगारेटचा धूर निघतो. त्यामुळे तरुणाईला तर धोका आहेच, शिवाय त्यांच्या आजूबाजूला असणार्या सुदृढ नागरिकांनाही पॅसिव्ह स्मोकिंगचा मोठा धोका आहे.
शहर गुणवत्ता श्रेणी
तज्ज्ञांच्या मते शहर सर्वप्रकारच्या धुलिकणांनी वेढलेले आहे, त्यामुळे व्यायाम करताना तो रहदारीच्या ठिकाणी करू नका. सायकल चालवताना पहाटे प्रदूषण कमी असताना चालवा. दिवसा शहरातून सायकल चालवणेही धोकादायक आहे कारण श्वासोच्छ्वास वाढेल, तेवढी तुमची फुफ्पुसे धुलिकणांनी भरून जातील. हल्ली हा धोका शहरात फार वाढल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन तज्ज्ञांनी
केले आहे.
शहरात सर्वत्र वाहनांची
प्रचंड वर्दळ वाढल्याने अस्थमासह श्वसनाचे त्रास वाढल्याच्या तक्रारी घेऊन येणारे रुग्ण वाढले आहेत. सतत मास्क वापरणे हाच यावर उपाय आहे. बाजूची व्यक्ती धूम—पान करीत असेल अन् तुम्ही मास्क घातला नसेल तर तुम्हाला दुप्पट त्रास होतो. त्यामुळे सतत मास्क वापरला पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी पायी फिरताना तर मास्क आवर्जून
वापरायला हवा.– डॉ. अमित द्रविड, फिजिशियन
हेही वाचा