Pune NEET Paper Leak Protest Pudhari
पुणे

Pune NEET Paper Leak Protest: पुण्यात काँग्रेस, वंचित आणि भाजप आमनेसामने; NEET प्रकरणावर आंदोलन तीव्र

NEET परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावर पुण्यात विविध राजकीय पक्ष आणि संघटनांचे आंदोलन; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत निषेध, तर भाजपने काँग्रेसवर प्रत्यारोप केले

पुढारी वृत्तसेवा

पुणे: नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणावरून शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने मंगळवारी (दि. २२) राजभवनवर काळे झेंडे दाखवून आंदोलन केले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चवधरी यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततामय आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याचा निषेध केला. विद्यार्थ्यांशी संवाद साधून प्रश्न सोडवण्याऐवजी सरकारने दडपशाहीचा मार्ग स्वीकारल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यघटनेने दिलेल्या शांततामय आंदोलनाच्या अधिकाराचा सन्मान केला गेला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

पूर्व विभागाचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सरकार भ्रष्टाचारमुक्त असल्याचा दावा करताना पेपरफुटीसारख्या घटनांनी शिक्षणव्यवस्थेवरील विश्वास हादरल्याचे सांगितले. देशभरातील विद्यार्थी न्यायासाठी आंदोलन करताना केंद्र सरकारने शिक्षणमंत्र्यांना अभय दिल्याचा आरोप त्यांनी केला. शिक्षण हे प्रत्येक विद्यार्थ्याच्या भवितव्याशी जोडलेले असून, अशा घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीस मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

या आंदोलनात नगरसेवक रफिक शेख, अविनाश साळवे, साहिल केदारी, विशाल मलके, अविनाश बागवे, अमीर शेख, मेहबूब नदाफ, भाऊसाहेब आजबे, सतीश पवार, जीवन चाकणकर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. काँग्रेसने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर संघर्ष सुरूच ठेवण्याचा इशाराही या वेळी दिला.

अमानुष मारहाणीला केंद्रीय गृहमंत्री जबाबदार

जंतर मंतर मैदानात पोलिसांनी विद्यार्थ्यांना मारहाण करत आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांना अमानुष पद्धतीने दिल्‍लीच्या पोलिसांनी मारहाण केली असून, याला केंद्रीय गृहमंत्री जबाबदार आहेत. त्यामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री आणि गृहमंत्री यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी वंचितचे शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे आणि युवक आघाडीचे शहराध्यक्ष सागर आल्हाट यांनी पत्रकार परिषदेत केली.

या आंदोलनामध्ये आरएसएसचे समर्थक ही सहभागी असल्याचा संशय असून, सरकारचा निषेध म्हणून वंचितचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी (दि. २३ जुलै) पुणे शहर पूर्ण बंदमध्ये सहभागी होणार आहे. या बंदमुळे पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत आणि महाविद्यालयात पाठवू नये. विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक संघटना, व्यापारी वर्ग, विविध समविचारी पक्ष आदींनी या बंदमध्ये सहभागी व्हावे. केंद्रीय शिक्षणमंत्री यांनी राजीनामा द्यावा, ही प्रमुख मागणी असणार आहे.

आज गुरुवारी सकाळी १० वाजता डेक्कन येथील संभाजी महाराज यांच्‍या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करणार आहोत. त्यानंतर हा मोर्चा लक्ष्मी रस्‍तामार्गे भवानी पेठमधून पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे समारोप होणार आहे. यादरम्यान रेल्वे, एसटी, बसेस आदी बंद असणार आहेत. हे आंदोलन शांततेत होणार असून, या बंदमध्ये विविध ३० हून अधिक संघटनांनी आतापर्यंत पाठिंबा देऊन सहभागी होणार असल्याचे ॲड. तायडे यांनी या वेळी सांगितले.

काँग्रेसच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाचे आंदोलन

दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात काँग्रेसचे गुंड घुसल्याचा आरोप करत भाजप युवा मोर्चाच्या वतीने बुधवारी (दि. २२) सायंकाळी पुण्यात जोरदार निदर्शने करण्यात आली. बालगंधर्व रंगमंदिर परिसरात हे आंदोलन पार पडले. मंगळवारी काँग्रेसतर्फे केलेल्या आंदोलनाचा निषेध नोंदविण्यासाठी भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.

​भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी बालगंधर्व परिसरात निदर्शने केल्यानंतर काँग्रेस भवनाच्या दिशेने कूच करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पोलिसांनी प्रसंगावधान राखत कार्यकर्त्यांना वेळीच रोखले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलक माघारी फिरले.

​दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी आधीच सतर्कता बाळगत काँग्रेस भवन परिसराला चारही बाजूंनी कडेकोट बंदोबस्त लावला होता. त्यामुळे काँग्रेस भवन परिसराला अक्षरशः छावणीचे स्वरूप आले होते.

दिल्लीत विद्यार्थ्यांचे जे आंदोलन सुरू आहे, त्यामध्ये काँग्रेसच्या गुंडांनी प्रवेश करून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप या वेळी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनादरम्यान केला.

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी 'स्टडी ब्रेक' घ्यावा!

देशभर सुरू असलेले विद्यार्थी आंदोलन हे आता केवळ केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीपुरते किंवा एका परीक्षेच्या वादापुरते मर्यादित राहिलेले नाही. ते लोकशाही, सार्वजनिक शिक्षण आणि संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी उभे राहिलेले व्यापक जनआंदोलन बनले आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक पी. साईनाथ यांनी बुधवारी व्यक्त केले. याचवेळी त्यांनी 'केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आधी 'स्टडी ब्रेक' घ्यावा आणि 'एंटायर पॉलिटिकल सायन्स'मध्ये मास्टर्सची पदवी मिळवावी,' असा टोलाही लगावला. जनशक्ती ग्रंथ प्रकाशन मुंबईच्या वतीने पी. साईनाथलिखित 'एव्हरीबडी लव्हज् अ गुड ड्रॉट' या इंग्रजी पुस्तकाचे लेखक हेमंत कर्णिक यांनी केलेल्या 'दुष्काळ आवडे सर्वांना' या मराठी अनुवादित पुस्तकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अशोक ढवळे होते. शेती आणि पाणी प्रश्न अभ्यासक डॉ. सोमीनाथ घोळवे, महिला किसान मंचच्या सीमा कुलकर्णी आणि अजित अभ्यंकर उपस्थित होते. महाराष्ट्रातील शेतकरी आंदोलनांनी देशाला लोकशाही मार्गाने संघर्ष करण्याची दिशा दिली, असे सांगताना त्यांनी नाशिक-मुंबई शेतकरी लाँग मार्चचा उल्लेख केला. शेकडो किलोमीटर पायी चालत आलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आपल्या शांततामय संघर्षातून संपूर्ण देशाला प्रेरणा दिली आणि त्याच संघर्षातून दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला प्रेरणा मिळाली. या आंदोलनांनी देशाला लोकशाही मार्गाने संघर्ष करून सरकारलाही झुकवता येते, हे दाखवून दिले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सुरू असलेले आंदोलन हे आता जनतेचे आंदोलन बनल्याचेही ते म्हणाले. कार्यक्रमात डॉ. अशोक ढवळे, सीमा कुलकर्णी आणि डॉ. सोमीनाथ घोळवे यांनी विचार मांडले.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे हाल

देशात पाणी आणण्यासाठी लागणाऱ्या एकूण वेळेपैकी ८० टक्के वेळ ग्रामीण महिलांचा जातो. पण त्यांची किंमत कोणी करत नाही, असेही पी. साईनाथ यांनी सांगितले. युद्ध आणि जागतिक घडामोडींमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. डिझेलची टंचाई आहे. डिझेलअभावी अनेक भागांत शेतकऱ्यांना पुन्हा बैलांच्या साहाय्याने नांगरणी करावी लागत असून, बैलभाड्याचे दर दुप्पट-तिप्पट झाले आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

'मीडिया' आणि 'पत्रकारिता' या दोन वेगळ्या गोष्टी

आज 'मीडिया' आणि 'पत्रकारिता' या दोन वेगळ्या गोष्टी बनल्या आहेत, असे सांगत पी. साईनाथ यांनी काही कॉर्पोरेट माध्यमे फक्त उच्चभ्रू वर्गाचे जीवन दाखवत असताना ग्रामीण भारतातील सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणे हीच खरी पत्रकारिता आहे. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंग यांनी केलेली पत्रकारिता लोकहित आणि सामाजिक बांधिलकी जपणारी होती, असे पी. साईनाथ यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT