

विनोद गायकवाड
पांढरेवाडी: कुरकुंभ एमआयडीसी हे राज्यातील महत्त्वाच्या रासायनिक औद्योगिक क्षेत्रांपैकी एक मानले जाते. महाराष्ट्रातील प्रमुख केमिकल हबपैकी कुरकुंभचा समावेश होतो आणि येथे विविध प्रकारचे रसायन, औषधनिर्मिती, औद्योगिक उत्पादन करणारे उद्योग कार्यरत आहेत.
मात्र, अलिकडील कारवायांमुळे या औद्योगिक क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या रसायनांचा नेमका उपयोग काय? त्यांची खरेदी-विक्री किती पारदर्शक आहे? आणि काही ठिकाणी बोगस उत्पादनांची साखळी तर कार्यरत नाही ना? असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. रासायनिक उद्योगांमध्ये विविध प्रकारची केमिकल्स उत्पादन प्रक्रियेसाठी वापरली जातात. या रसायनांचा उपयोग औषधे, औद्योगिक सॉल्व्हंट, रंग, प्रक्रिया उद्योग आणि इतर उत्पादनांसाठी होतो.
मात्र, अशाच रसायनांचा गैरवापर करून बनावट उत्पादने, निकृष्ट दर्जाचे रासायनिक मिश्रण किंवा बेकायदेशीर उत्पादन तयार केले जात असल्याच्या तक्रारी वेळोवेळी समोर येत असतात. कोणत्याही रसायनाची खरेदी, साठवणूक, वापर आणि विक्रीबाबत स्पष्ट नोंदी ठेवणे बंधनकारक असते. परंतु, प्रत्यक्षात सर्व व्यवहारांची काटेकोर पडताळणी होत आहे का? हा प्रश्न कायम आहे. काही उद्योगांमध्ये परवानगी असलेल्या उत्पादनांव्यतिरिक्त अन्य उत्पादनांची निर्मिती केली जाते का? याची तपासणी संबंधित विभागांनी नियमितपणे करणे आवश्यक आहे.
कुरकुंभ एमआयडीसी ही हजारो कामगारांना रोजगार देणारी आणि राज्याच्या औद्योगिक विकासात मोलाचा वाटा उचलणारी औद्योगिक वसाहत आहे. त्यामुळे काही मोजक्या गैरप्रकारांमुळे संपूर्ण उद्योगनगरीची प्रतिमा मलिन होऊ नये, यासाठी प्रामाणिक उद्योगांसह प्रशासनानेही अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे.
बोगस केमिकलचा बाजार, बनावट उत्पादनांचा संशय आणि तपास यंत्रणांची भूमिका, या सर्व बाबींचा सखोल तपास झाल्यासच कुरकुंभ एमआयडीसीतील वास्तव जनतेसमोर येऊ शकेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.