पुणे: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रत्येक मताला विशेष महत्त्व असते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाने आपल्या बूथ कार्यकर्त्यांना बोगस व दुबार मतदारांवर काटेकोर लक्ष ठेवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष राहावी, यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर सतर्कता ठेवण्यावर पक्षाने भर दिला आहे.
महापालिका निवडणुकीसाठी बुधवारी मतदान होत असून, शहरात एकूण 4 हजार 11 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. या सर्व मतदान केंद्रांवर राष्ट्रवादी काँग््रेास पक्ष आणि राष्ट्रवादी काँग््रेास शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जवळपास 4 हजार बूथ प्रमुख व कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे बूथप्रमुख सकाळी 6 वाजल्यापासून मतदान संपेपर्यंत मतदान केंद्रावर उपस्थित राहणार आहेत.
पक्ष व उमेदवारांच्या पातळीवर बूथ कार्यकर्त्यासाठी सकाळी चहा व नाश्ता, दुपारी 1 वाजता जेवण आणि सायंकाळी 5 वाजता चहा अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मतदान केंद्रावर लागणाऱ्या आवश्यक साहित्याबाबतही विशेष दक्षता घेण्यात आली आहे.या बूथ कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाच्या वतीने निवडणुकीपूर्वीच विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. बूथप्रमुख हा मतदार यादी प्रमुखही असल्याने त्याला ‘हजारी प्रमुख’ असेही संबोधले जाते. संबंधित बूथमधील बहुतांश मतदारांची त्याला प्रत्यक्ष ओळख असल्यामुळे बोगस मतदार ओळखणे सुलभ होणार आहे.
मतदान केंद्रावर दुबार मतदान किंवा बोगस मतदान करण्याचे प्रकार रोखण्यासाठी कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काही वेळा थिनर किंवा रसायनांच्या साहाय्याने बोटावरील शाई पुसली जात असल्याच्या घटना घडतात. त्यामुळे अशा संशयास्पद प्रकारांवर लक्ष ठेवून तत्काळ निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणण्याचे निर्देश बूथ कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत.
बूथप्रमुखांची जबाबदारी
मतदान केंद्रावर सकाळी 6 वाजल्यापासून मतदान संपेपर्यंत उपस्थित राहणे.
मतदार यादी पाहून येणाऱ्या मतदारांची पडताळणी करणे.
दुबार किंवा बोगस मतदानाच्या संशयास्पद प्रकारांवर लक्ष ठेवणे
बोटावरील शाई पुसण्याचा किंवा बदल करण्याचा प्रयत्न आढळल्यास तत्काळ लक्ष देणे
कोणताही संशयास्पद प्रकार आढळल्यास निवडणूक अधिकारी व पक्ष समन्वयकांना माहिती देणे