Pune Navale Bridge Truck Accident Pudhari
पुणे

Pune Accident: पुण्यात नवले पुलावर भीषण अपघात; भरधाव ट्रकची 6 वाहनांना धडक, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Pune Navale Bridge Truck Accident: पुण्यातील नवले पुल परिसरात भरधाव ट्रकने सिग्नलवर थांबलेल्या वाहनांना धडक दिल्याची भीषण घटना घडली आहे. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले.

Rahul Shelke

Pune Navale Bridge Truck Accident: पुण्यातील कात्रज–नवले पूल पुन्हा एकदा भीषण अपघातामुळे चर्चेत आला आहे. आज सकाळी या भागात झालेल्या अपघातामुळे परिसरातील नागरिक आणि वाहन चालक हादरले. सिग्नलवर थांबलेल्या वाहनांवर भरधाव ट्रक आदळल्याने एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक वाहनांचे नुकसान झाले.

सकाळी सुमारे साडेसहा वाजण्याच्या सुमारास नवले पुलाखालील चौकात नेहमीप्रमाणे वाहनांची वर्दळ सुरू होती. सिग्नल लाल असल्यामुळे अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहने सिग्नल सुटण्याची वाट पाहत थांबली होती. त्याच वेळी कात्रज बोगद्याच्या दिशेने उतारावरून वेगाने येणाऱ्या एका ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले. वेग आणि उतारामुळे ट्रक थेट सिग्नलवर उभ्या असलेल्या वाहनांवर आदळला.

सर्वप्रथम ट्रकने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका मोठा होता की दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर ट्रकने समोर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांना एकामागोमाग धडक दिली. या धडकेत किमान पाच कारचे मोठे नुकसान झाले.

अपघातानंतर काही वेळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. रस्त्यावर वाहनांचे तुकडे पसरले होते आणि अपघात पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. यामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.

घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक हळूहळू सुरळीत केली. मृत दुचाकीस्वाराचा मृतदेह पुढील तपासासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला असून, ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

कात्रज–नवले पूल परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे हा भाग आधीच धोकादायक म्हणून ओळखला जातो. तीव्र उतार, वेगाने धावणारी वाहने आणि वाढती वाहतूक यामुळे येथे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची तक्रार स्थानिकांनी अनेकदा केली आहे. प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या असल्या तरीही अपघातांची मालिका सुरूच आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT