

पुणे : मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले पुलावरील अपघाताचे सत्र काही थांबेना. सोमवारी दुपारी नवले पुलावर पुन्हा एकदा अपघात झाला असून चार ते पाच गाड्यांनी एकमेकांना धडक दिली. या अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक पूर्ववत केली आहे.
नवले पुलावर 13 नोव्हेंबररोजी (गुरुवारी) संध्याकाळी भीषण अपघात झाला होता. नियंत्रण सुटलेल्या भरधाव ट्रेलरने वाहनांना दिलेल्या धडकेत एका प्रवासी कारला आग लागल्याने आठ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच सोमवारी दुपारी पुन्हा एकदा नवले पुलावर अपघात झाला.
सोमवारी दुपारी चार ते पाच वाहनांनी एकमेकांना धडक दिली. या अपघातात काही जण किरकोळ जखमी झाले आहेत. पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले असून वाहतूक पूर्ववत झाली आहे. नियंत्रण सुटल्यानेच हा अपघातही घडला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.
नवले पुलावर गेल्या पाच वर्षांत किती अपघात झाले?
गेल्या पाच वर्षांत या परिसरात २५७ अपघात नोंदवले गेले असून, त्यापैकी ९५ अपघात गंभीर स्वरूपाचे होते. मागील पाच वर्षात नवले पूल परिसरात ११५ जणांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती वाहतूक पोलिसांकडून समोर आली आहे. याच काळात ९४ नागरिक जखमी झाल्याची नोंद आहे. त्यामुळे नवले पूल परिसर मृत्यूचा सापळाच झाल्याची भीती वाहनचालकांमध्ये निर्माण झाली आहे.