Navale Bridge Container Accident Pudhari
पुणे

Navale Bridge Container Accident: नवले पुलाजवळ कंटेनरच्या धडकेत २२ वर्षीय कामगाराचा मृत्यू; सहा जण जखमी

भरधाव कंटेनरने टेम्पोसह मोटार व ट्रकला दिल्या धडका; चालक पोलिसांच्या ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

पुणे/धायरी: मुंबई- बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवले पूल परिसरातील अपघाताची मालिका थांबण्याचे नाव घेताना दिसून येत नाही. भरधाव कंटेनरने काँक्रीट पंप वाहणाऱ्या टेम्पोला दिलेल्या जोरदार धडकेत टेम्पोतील २२ वर्षीय कामगार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. १९) मध्यरात्री घडली. दरम्यान, कंटेनरने एकापाठोपाठ वाहनांना धडक दिली. या अपघातात सहा जण जखमी झाले आहेत.

संदीप जगन्नाथ कुमार (वय २२, रा. नरहटी, जि. सोनभद्र, उत्तर प्रदेश) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कंटेनरचालक धनराज गणपतलाल वैष्णव (वय २४, सध्या रा. रामसर, जि. अजमेर, राजस्थान) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला नऱ्हे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कंटेनरचालकाचे नियंत्रण सुटले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाह्यवळण मार्गावरून शनिवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास भरधाव कंटेनर मुंबईकडे निघाला होता. काँक्रीट पंप वाहून नेणारा टेम्पो मुंबईकडे निघाला होता. नवले पुलाजवळ भरधाव कंटेनरचालकाचे नियंत्रण सुटले. कंटेनरने पाठीमागून टेम्पोला धडक दिली. धडक एवढी जोरात होती की टेम्पोच्या मागील बाजूचा चुराडा झाला. टेम्पोतील कामगार संदीप कुमार हा गंभीर जखमी झाला. कंटेनरने एका मोटारीसह ट्रकला धडक दिली.

अपघातात टेम्पोतील दोन कामगार जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच सिंहगड रस्ता वाहतूक विभाग आणि नऱ्हे पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या संदीप कुमार याच्यासह सहा जणांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच संदीप कुमार याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. अपघातात कंटेनरचालक वैष्णव हा जखमी झाला. ससून रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. सहाय्यक पोलिस निरीक्षक समीर चव्हाण तपास करीत आहेत.

रस्ता बनला मृत्यूचा सापळा

नवीन कात्रज बोगद्यापासून ते नवले पुलापर्यंतचा राष्ट्रीय महामार्गाचा परिसर हा अपघात प्रवणक्षेत्र म्हणून ओळखला जातो. सतत होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून विविध प्रकारच्या उपायोजन करण्यात आल्या आहेत. वेगमर्यादेवर देखील नियंत्रण आणले आहे. परंतु, असे असताना देखील या परिसरातील अपघाताची मालिका काही केल्याने थांबण्याचे नाव घेताना दिसून येत नाही. त्यामुळे हा रस्ता केल्या काही वर्षांपासून मृत्यूचा सापळा बनल्याचे दिसून येते.

अपघातानंतर वाहतूक विस्कळीत

अपघातानंतर बाह्यवळण मार्गावरून मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साहाय्याने बाजूला काढल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT