

शिवाजी शिंदे
पुणे: राज्यात सध्या एकल महिलांची संख्या सुमारे ५४ लाखांच्या आसपास असून, राज्यातील एकल महिलांची संख्या नक्की किती आहे. याबाबत माहिती घेण्यासाठी जिल्हानिहाय माहिती संकलित करण्यात येणार आहे. दरम्यान, या एकल महिलांना सक्षम करण्यासाठी राज्य शासन नवीन धोरण राबविणार आहे.
राज्य सरकारकडून एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्याच्या दृष्टीने जिल्हानिहाय सर्वेक्षणाला वेग देण्यात आला आहे. आतापर्यंतच्या सर्वेक्षणातून राज्यात सुमारे ५४ लाख एकल महिलांची प्राथमिक नोंद झाली आहे. मात्र, शहरी भागातील सर्वेक्षणाला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नसल्याने सर्व जिल्ह्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
...असे सुरू आहे सर्वेक्षण
एकल महिलांमध्ये विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता तसेच अविवाहित राहिलेल्या महिलांचा समावेश केला जात आहे.
२०११ च्या जनगणनेनंतर या महिलांची अद्ययावत राज्यव्यापी आकडेवारी उपलब्ध नसल्याने शासनाकडून स्वतंत्र सर्वेक्षण करण्यात येत आहे.
सुमारे १५ वर्षांपूर्वीच्या जनगणनेतील आकडेवारीवर सध्याच्या योजनांचे नियोजन करणे अपुरे ठरत असल्याने नव्या सर्वेक्षणाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
जिल्हास्तरावरही मोठ्या संख्येने एकल महिला असल्याचे सर्वेक्षणातून दिसून येत आहे. नाशिक जिल्ह्यात ‘नवचेतना’ अभियानांतर्गत ९४ हजार ९८५ एकल महिला आढळल्या आहेत. जिल्हा परिषदेकडून या महिलांच्या सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी पुढील उपाययोजनांवर भर दिला जात आहे.
पुणे जिल्ह्यातही एकल महिलांसाठी स्वतंत्र योजना आखण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण करण्यात आले आहे.
या सर्वेक्षणात महिलांचे वय, सामाजिक स्थिती, उत्पन्नाचे स्रोत आणि कौटुंबिक परिस्थिती यासारखी माहिती संकलित करण्यात आली आहे.