पुणे: मुलांमधील जंतसंसर्गामुळे होणारा रक्तक्षय आणि कुपोषण रोखण्यासाठी पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज (मंगळवार) राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात येत आहे. एक ते १९ वर्षे वयोगटातील शाळा, अंगणवाड्या, कनिष्ठ महाविद्यालये आणि वरिष्ठ महाविद्यालयांच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना, मुला-मुलींना मोफत जंतनाशक गोळ्या दिल्या जाणार आहेत.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार सरकारी, अनुदानित आणि खासगी शाळांसह महापालिका शाळा, आश्रमशाळा, सीबीएसई शाळा, गुरुकुल आणि विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचाही मोहिमेत समावेश करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार जंतनाशक गोळ्यांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षण विभागाने पात्र लाभार्थ्यांची माहिती घेऊन सार्वजनिक आरोग्य विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळा, अंगणवाड्या आणि संबंधित शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्याचे नियोजन आहे.
शाळेत जाणाऱ्या मुलांना शाळेत, तर अंगणवाडीत नोंद असलेल्या बालकांना अंगणवाडीत गोळ्या दिल्या जाणार आहेत. शाळा किंवा अंगणवाडीत न जाणाऱ्या पात्र मुलांच्या समावेशासाठी स्थानिक आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधता येईल. मात्र, पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील केंद्रनिहाय वेळापत्रक तसेच लाभार्थ्यांची स्वतंत्र संख्या अद्याप उपलब्ध झालेली नाही. महापालिका, प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय रुग्णालये आणि जिल्हा परिषद शाळा, अंगणवाड्यांमध्ये या गोळ्या मिळणार आहेत.
जंतनाशक मोहिमेंतर्गत वंचित राहिलेल्या मुला-मुलींसाठी ३ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. आजारी असलेल्या मुलांना किंवा विशेष वैद्यकीय काळजी आवश्यक असलेल्या विद्यार्थ्यांना गोळी देण्यापूर्वी आरोग्य कर्मचाऱ्यांचा सल्ला घ्यावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.डॉ. रामचंद्र हंकारे, जिल्हा आरोग्य अधिकारी, पुणे.