Pune Nashik Highway Accident Risk Pudhari
पुणे

Pune Nashik Highway Accident: पुणे-नाशिक महामार्गावरील पानमळा वळण बनले जीवघेणे; गतिरोधक दबल्याने अपघातांचा धोका

वेगवान वाहनांमुळे स्थानिकांचा जीव धोक्यात; तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

राजगुरुनगर: पुणे-नाशिक महामार्गावरील पानमळा आणि तुकाईवाडीकडे असलेल्या वळणावर नागरिकांना येजा करताना जीव धोक्यात घालावा लागत आहे. या वळणाच्या दोन्ही बाजूचे गतिरोधक पुर्णपणे दबले आहेत. त्यामुळे वळण रस्ता असताना देखील महामार्गावरून येजा करणारी वाहने वेगात जातात.

गतिरोधक दबून गेल्याने वेग आणि रस्त्यावरील डांबर फुगल्याने येथुन पुढे जाणाऱ्या वाहनावर चालकांचे नियंत्रण रहात नाही. परिणामी अनेक अपघात घडत असुन हा वळण रस्ता जीवघेणा ठरत आहे. राजगुरुनगर बाह्यवळण संपल्यावर असलेल्या तुकाईवाडी चौकात यापुर्वी वळण रस्ता असताना वापरात होता. येथेही अपघात घडत होते.

काही महिन्यापूर्वी धोकादायक म्हणुन महामार्ग प्रशासनाने येथे लोखंडी जाळ्या (बॅरिकेट) लावुन हा वळण रस्ता बंद केला. त्यामुळे पानमळा येथे येऊन वळण घेणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आणि अपघातही वाढले. दोन्ही बाजूला सेवा रस्ता काम होणार आहे. मात्र त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.

अरुंद आणि दबलेल्या गतिरोधकांच्या मार्गाने वाहने सुसाट आणि वळण घेणाऱ्या स्थानिकांचा जीव धोक्यात अशी गंभीर अवस्था या चौकात झाली आहे. शालेय विद्यार्थी, शेतकरी आणि कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांना दिवसा व रात्री, अपरात्री येथील प्रवास धोकादायक ठरतो आहे.

यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी वेहेळदरा येथील ह.भ.प. पोपट महाराज राक्षे तसेच तिन्हेवाडी विकास सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र पाचारणे, वरच्या भांबुरवाडीचे सरपंच विजय थिगळे यांच्या सह परिसरातील गावच्या ग्रामस्थांनी केली आहे.

महामार्ग प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली असून येत्या दोन दिवसांत समस्यांचे निराकरण करण्यात येईल. असे आमदार बाबाजी काळे यांनी याबाबत म्हटले आहे.

राजगुरुनगर , मंचर किंवा त्यापुढे येण्याजाण्यासाठी सांडभोरवाडी, तुकाईवाडी, भांबुरवाडी गावातील बहुतांश वाहनचालकांना महामार्ग रस्त्याचा वापर करावा लागतो. पानमळा येथे रस्ता (लेन) बदलुन अलीकडे पलीकडे जावे लागते. महामार्गावरील वाहने वेगात असल्याने अनेक अपघात घडत आहेत. महामार्ग प्रशासनाने तात्काळ उपाय योजना करावी अन्यथा आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल.
प्रतीक्षा पाचारणे, सरपंच, तिन्हेवाडी
येथील स्थिती बाबत लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्याबाबत माहिती दिली असुन महामार्ग प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेत येत्या आठवड्यात पाहणी करून उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.
दिलीप मेदगे, समन्वयक, पुणे- नाशिक महामार्ग.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT