पुणे: पुण्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाची साक्ष देणाऱ्या नानावाड्याच्या जतन-संवर्धनासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. या ऐतिहासिक वास्तूच्या दुरुस्तीची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी सुमारे ६० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यामध्ये इमारतीचा दर्शनी भाग, छताची गळती रोखणे, खिडक्यांना लाकडी छज्जे बसविणे तसेच रेकॉर्ड रूमच्या दुरुस्तीचा समावेश आहे. या कामांसाठी भवन आणि हेरिटेज विभागाने निविदा प्रक्रिया पूर्ण केली असून, लवकरच प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.
नानावाडा ही पुण्याच्या ऐतिहासिक वारशातील महत्त्वाची वास्तू असून, तिचे मूळ स्वरूप जतन करण्यासाठी महापालिकेकडून टप्प्याटप्प्याने दुरुस्ती आणि संवर्धनाची कामे केली जात आहेत. त्याचाच पुढील टप्पा म्हणून दर्शनी भाग आणि दगडी इमारतीतील उर्वरित कामे हाती घेण्यात येणार आहेत. यासाठी ५९ लाख ९४ हजार ७४२ रुपयांची तरतूद उपलब्ध असून, याच रकमेचे पूर्वगणनपत्रक तयार करण्यात आले आहे.
या कामांमध्ये इमारतीच्या दर्शनी भागातील खिडक्यांना लाकडी छज्जे बसविणे आणि त्यावर केम्प्रोल वॉटरप्रूफिंग करणे, छतामधून होणारी पाण्याची गळती रोखण्यासाठी दुरुस्ती करणे, रेकॉर्ड रूमची डागडुजी आणि संपूर्ण रंगरंगोटी अशा कामांचा समावेश आहे. पावसाळ्यात छतामधून पाणी झिरपल्याने इमारतीच्या बांधकामाला धोका निर्माण होऊ नये, तसेच दर्शनी भागाचे संरक्षण व्हावे, या दृष्टीने ही कामे महत्त्वाची ठरणार आहेत.
या कामांसाठी महापालिकेकडे दोन निविदा प्राप्त झाल्या होत्या. दोन्ही निविदाधारक पात्र ठरले आहेत. निविदेतील जीएसटीची रक्कम ९ लाख १४ हजार ३६१ रुपये आहे. या कामासाठी २९ जून २०२६ रोजी खातेप्रमुखांची मान्यता घेण्यात आली होती. तसेच, निविदा प्रक्रियेसाठी आवश्यक प्रशासकीय मान्यताही देण्यात आली आहे.
नानावाड्याच्या वास्तूला अधिक सुस्थिती प्राप्त
नानावाड्यासारख्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन करताना त्यांचे मूळ स्थापत्यवैशिष्ट्य कायम ठेवणे आणि काळाच्या ओघात वास्तूची होणारी झीज रोखणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर उर्वरित दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतर नानावाड्याच्या वास्तूला अधिक सुस्थिती प्राप्त होणार आहे. तसेच, पर्यटक आणि नागरिकांना या ऐतिहासिक वास्तूचा अधिक चांगल्या प्रकारे लाभ घेता येणार आहे. त्यामुळे नानावाड्याच्या जतन-संवर्धनाच्या दृष्टीने हा टप्पा महत्त्वाचा मानला जात आहे.