पुणे: श्रावणातील पहिल्या सणाचा उत्साह शहरात अनुभवायला मिळत असून, नागपंचमीचा सण सोमवारी (दि. १७ ऑगस्ट) पारंपरिक आणि भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे. नागदेवतेच्या प्रतिमेचे, प्रतीकात्मक स्वरूपाचे अथवा चित्राचे पूजन करून घराघरांत सुख-समृद्धीची प्रार्थना केली जाणार आहे. शहरातील विविध मंदिरांमध्ये अभिषेक, महापूजा, आरती यांसह धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांसाठी मंदिरे दिवसभर दर्शनासाठी खुली राहणार आहेत.
नागपंचमीला नागदेवतेची पूजा करून समृद्धी-भरभराटीची कामना केली जाते. मंदिरांमध्ये नागपंचमीच्या पूजेची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवमंदिरांसह विविध मंदिरांमध्ये पहाटेपासूनच धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. महिला पारंपरिक वेशभूषेत नागदेवतेचे पूजन करून कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करणार आहेत.
तसेच, विविध संस्था आणि संघटनांकडून धार्मिक कार्यक्रमांसोबतच सांस्कृतिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. जिवंत नागाची पूजा करण्याऐवजी नागदेवतेच्या प्रतिमेचे, प्रतिकात्मक स्वरूपाचे किंवा चित्राचे पूजन करावे, असे आवाहन सामाजिक संस्था आणि प्राणिप्रेमी संघटनांकडून करण्यात आले आहे.
यानिमित्ताने 'प्राण्यांवर प्रेम करा, त्यांचा आदर करा' हा संदेश देत जनजागृती केली जाणार आहे. महिला आणि युवतींसाठी मेंदी रेखाटन, मनोरंजक खेळ तसेच अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले आहे. त्यामुळे धार्मिक उत्साहासोबतच सांस्कृतिक रंगानेही नागपंचमी बहरणार आहे.
श्रावणी सोमवारनिमित्त शिवमंदिरांत विविध कार्यक्रम
नागपंचमी आणि श्रावणातील पहिला सोमवार एकाच दिवशी असल्याने शिवभक्तांसाठी आजचा दिवस विशेष ठरणार आहे. शहरातील शिवमंदिरांमध्ये पहाटेपासून रुद्राभिषेक, महापूजा, आरती आदी धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. मंदिर परिसरात फुलांची सजावट आणि आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. 'हर हर महादेव'च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमणार असून, भक्तिमय वातावरणात श्रावणी सोमवार आणि नागपंचमीचा उत्साह द्विगुणित होणार आहे.