अशोक मोराळे
पुणे: खून होण्यासाठी मोठे भांडण, मालमत्तेचे वाद अशीच कारणे असतील असे आपल्याला वाटते. मात्र, प्रत्यक्षात, शहरात क्षुल्लक कारणांवरून होणाऱ्या वादावादींचे रूपांतर देखील थेट खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांत होत असल्याचे चिंताजनक चित्र समोर आले आहे. क्षणिक राग, सूडभावना आणि संशय यांच्या भरात घेतलेले निर्णय अनेक कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत. मागील पाच वर्षांत शहरात घडलेल्या खुनांच्या घटनांचा आढावा घेतला असता, किरकोळ वाद हीच बहुतेक घटनांची ठिणगी ठरल्याचे दिसून आले आहे.
एकीकडे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर माणसाने खूप मोठी प्रगती केली. आपले निर्धारित उद्दिष्ट गाठण्यासाठी या स्पर्धेच्या युगात तो वेगाने पळतो आहे; परंतु याच कालवधीत तो त्याचा संयमसुद्धा सोडतो आहे. मानसिक ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यात कमी पडल्याने क्षणिक कारणाच्या रागातून त्याच्या हातून खुनासारखे मोठे कृत्य घडत आहे. जानेवारी 2021 ते फेबुवारी 2026 दरम्यानच्या या पाच वर्षांच्या कालावधीत शहरात तब्बल 499 खुनाच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये 235 खुनांच्या घटना या किरकोळ आणि तत्कालीन कारणातून घडल्या आहेत. त्यामुळे ही खुनांची आकडेवारी नक्कीच चिंता निर्माण करणारी आहे.
खुनांच्या घटनांबाबत दुसऱ्या कारणांचा विचार करायचे झाले तर पूर्ववैमनस्य, अनैतिक संबंध, चारित्र्याचा संशय, घरगुती वाद, प्रेमसंबंध अशी विविध कारणे समोर आली आहेत की, ज्यातून खुनाच्या घटना घडल्या आहेत. खून प्रकरणातील अनेक आरोपी पहिल्यांदाच गुन्हेगारी कृत्यात सहभागी झालेले आहेत. कोणताही पूर्वगुन्हेगारी इतिहास नसताना क्षणिक राग, अपमानाची भावना, संशय, तसेच कौटुंबिक किंवा अनैतिक नातेसंबंध उघड होण्याची भीती यामुळे त्यांनी अत्यंत टोकाचे पाऊल उचलल्याचे स्पष्ट झाले आहे. भावनांवर नियंत्रण न राहणे, तत्काळ परिणामांचा विचार न करणे आणि सामाजिक बदनामीची भीती या कारणांमुळे हे गुन्हे घडल्याचे तपासात उघड झाले आहे.
पूर्ववैमनस्याची ठिणगी, सुडाचा भडका
जुने वाद, मालमत्तेचे प्रश्न, व्यवसायातील मतभेद किंवा शेजार धर्मातील किरकोळ भांडणे दीर्घकाळ मनात साठत राहतात. योग्य वेळी संवाद न झाल्याने ही चीड कालांतराने वाढत जाते आणि एखाद्या छोट्याशा कारणावरून ती हिंसाचारात बदलते. अनेक प्रकरणांत आरोपी आणि मृत व्यक्ती पूर्वीपासून एकमेकांना ओळखत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातून त्यांनी एकमेकांचे मुडदे पाडले आहेत. तरुण वर्गामध्ये पूर्ववैमनस्याची खुन्नस सर्वाधिक असल्याचे दिसून येते. याच पाच वर्षांच्या कालावधीत पूर्ववैमनस्याच्या कारणातून 73 जणांचे खून झाले आहेत.
अनैतिक संबंध अन् चारित्र्याचा संशय
अनैतिक संबंध आणि चारित्र्याच्या संशयातून गेल्या पाच वर्षांत 50 खुनाच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये अनैतिक संबंधातून 20, तर चारित्र्याच्या संशयातून 30 खून झाले आहेत. खुनाच्या या बहुतेक प्रकरणांमध्ये पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसी किंवा अत्यंत जवळच्या नातेसंबंधातील व्यक्ती गुंतलेल्या आहेत. मोबाईलवरील संदेश, सोशल मीडियावरील संवाद, तसेच चारित्र्याविषयी निर्माण झालेला संशय यामुळे नात्यांमध्ये तणाव निर्माण होतो आणि तो क्षणात हिंसाचारात रूपांतरित होत असल्याचे तपास अधिकारी सांगतात. कौटुंबिक पातळीवर अनैतिक संबंधांचा संशय, पती-पत्नीतील अविश्वास किंवा बाहेरच्या व्यक्तींचा हस्तक्षेप यामुळे तणाव वाढतो. अशा परिस्थितीत संतुलन ढासळल्यास हिंसक प्रतिक्रिया उमटत असल्याचे गुन्हे तपासात दिसून आले आहे.
प्रेमसंबंधातील ताण-तणाव जीवघेणे
प्रेमसंबंधाच्या कारणातून या पाच वर्षांच्या कालावधीत 26 खुनांच्या घटना घडल्या आहेत. तरुणांमध्ये प्रेमसंबंधांतील मतभेद, बेकअप नंतरचा संताप, नकार सहन न होणे किंवा जोडीदारावर घेतलेला संशय यामुळे आक्रमकता वाढल्याचे निरीक्षण पोलिसदप्तरी आहे. काही घटनांमध्ये ’चारित्र्यावर संशय’ ही बाब वादाची सुरुवात ठरली आणि पुढे ती प्राणघातक हल्ल्यात परिवर्तित झाली.
घरगुती स्तरावरील कौटुंबिक वाद
घरगुती कारणांमुळे मागील पाच वर्षांत 31 खुनाच्या घटना शहरात घडल्या आहेत. कौटुंबिक वाद, पती-पत्नीतील मतभेद, चारित्र्यावर संशय, मालमत्तेचे वाद, तसेच अनैतिक संबंधांच्या आरोपांमुळे अनेक प्रकरणांत हिंसाचाराची परिसीमा गाठली गेली आहे. क्षणिक संताप आणि संवादाचा अभाव यामुळे किरकोळ वाद थेट जीवघेण्या हल्ल्यांत बदलल्याचे दिसून आले आहे. या खुनाच्या बहुतेक घटना घराच्या चार भिंतीआत घडल्या आहेत. अनेक आरोपी हे मृत व्यक्तींचे जवळचे नातेवाईक, पती, पत्नी, भाऊ, मुलगा किंवा इतर कुटुंबीय, असल्याचे समोर आले आहे.
अभ्यासक, समुपदेशक काय म्हणतात?
तज्ज्ञांच्या मते, तणाव सहन करण्याची क्षमता कमी होणे, संवादाचा अभाव, सोशल मीडियामुळे वाढलेली चिथावणीखोर भाषा आणि तत्काळ सूड घेण्याची मानसिकता या घटकांमुळे परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. रागावर नियंत्रण न ठेवणे आणि समस्येचे शांततामय मार्गाने निराकरण न करणे ही मोठी समस्या ठरत आहे. अभ्यासक आणि समुपदेशकांच्या मते, कुटुंबसंस्था कमकुवत होणे, व्यसनाधीनता, सोशल मीडियाचा अतिरेक आणि तणावपूर्ण जीवनशैली यामुळे अशा गुन्ह्यांना खतपाणी मिळत आहे. प्रेमसंबंध अपयशी ठरले किंवा अनैतिक नाते उघड होण्याची भीती वाटली, की अनेक जण रागावर नियंत्रण गमावून टोकाची पावले उचलत असल्याचेही ते सांगतात.