

पुणे: राज्यात शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या विविध कृषी पुरस्कारांसाठी पारंपरिक ऑफलाइन पद्धतीऐवजी आता ऑनलाइनद्वारे अर्ज करण्यासाठी संगणक प्रणाली विकसित केली आहे. तरी इच्छुक शेतकरी, व्यक्ती, संस्था व गटांनी सन 2025 च्या विविध कृषी पुरस्कारांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करून या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी केले आहे.
देशात महाराष्ट्र राज्य हे कृषी उत्पादन व कृषी उद्योग क्षेत्रात अग््रागण्य राज्य म्हणून ओळखले जाते. राज्यामध्ये दरवर्षी शेती व पूरक क्षेत्रात अतुलनीय व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, महिला, व्यक्ती तसेच संस्थांचा सन्मान राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत करण्यात येतो. राज्यात यापूर्वी विविध कृषी पुरस्कारांचे प्रस्ताव चार प्रतींमध्ये ऑफलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येत होते. प्रस्ताव बनविण्यासाठी खर्च येत असल्याने सर्व इच्छुक शेतकरी अर्ज करू शकत नव्हते. या पारंपरिक पद्धतीमुळे प्रस्ताव सादरीकरण, पडताळणी व संकलनासाठी अधिक कालावधीत लागत होता. या पार्श्वभूमीवर पुरस्कार प्रस्तावांची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक व प्रभावी करण्याच्या दृष्टीने कृषी विभागामार्फत पुरस्कार प्रस्ताव ऑनलाइन स्वरूपात स्वीकारण्यासाठी स्वतंत्र संगणकीय प्रणाली विकसित केली आहे.
ही प्रणाली कृषी विभागाच्या संकेतस्थळावर कृषी पुरस्कार टॅबमध्ये उपलब्ध आहे. या संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून पुरस्कार प्रस्ताव सादरीकरण, तपासणी, मूल्यांकन तसेच अहवालनिर्मिती ही संपूर्ण डिजिटल स्वरूपात राबविणे शक्य होणार आहे. यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन पारदर्शकता वाढणार आहे. या पुरस्कार प्रक्रियेची कार्यक्षमता, विश्वासार्हता व परिणामकारकता अधिक बळकट होणार आहे.
तसेच, शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे फायदा होणार आहे. त्यामध्ये ऑनलाइन प्रणालीमुळे शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज सादर करता येणार आहे. ऑफलाइन चार प्रतींमधील प्रस्ताव तयार करण्यासाठी लागणाऱ्या वेळ व खर्च प्रस्ताव सादरीकरण जलद गतीने होणार आहे. एकदाच अपलोड केलेली कागदपत्रे पुन:पुन्हा देण्याची आवश्यकता नाही. अर्ज कुठल्या टप्प्यावर आहे, याची माहिती शेतकऱ्यांना सहज मिळणार आहे. छपाई, झेरॉक्स, प्रवास व पोस्ट खर्च कमी होणार असून, आर्थिक भार कमी होणार असल्याची माहिती कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) रफिक नाईकवाडी यांनी केले आहे.
... हे आहेत कृषी पुरस्कार
कृषी पुरस्कारांमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यानपंडित पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), युवा शेतकरी पुरस्कार तसेच कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठीचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार इत्यादी पुरस्कारांचा समावेश आहे. हे पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते देऊन संबंधितांना सन्मानित करण्यात येते.