पुणे: श्रीमंत म्हणून ओळखल्या जाणार्या पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील कायम व रोजंदारी शिपाई व रखवालदारांना दर महिन्याला वेतनासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. अधिकारी वर्गाच्या बेजबाबदार कारभारामुळे वेळेवर पगार न मिळाल्याने कर्मचार्यांचे आर्थिक हाल होत असून, त्यांची बँक पतदेखील खराब होत आहे, वेळेवर पगार न झाल्याने आम्ही जगावे कसे ? असा सवाल करत कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत आहेत.
पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील कायम व रोजंदारी शिपाई व रखवालदारांचा पगार गेल्या काही महिन्यांपासून थकीत आहे. पगार उशिरा होत असल्याने कर्मचार्यांना बँक कर्जांच्या हप्त्यांवर विलंब शुल्क भरावे लागत आहे. (Latest Pune News)
एका कर्मचार्याने सांगितले की, दर महिन्याला दोन ते तीन हजार रुपये विलंब शुल्क आम्हाला भरावे लागते. गृहकर्ज, वाहनकर्ज आणि वैयक्तिक कर्जावरही दंडात्मक व्याज वसूल केले जात असून महापालिकेच्या बेजबाबदार कामामुळे आम्हाला भुर्दंड भरावा लागत आहे.
कामगार युनियनच्या म्हणण्यानुसार, या समस्येबाबत अनेकदा शिक्षण विभागातील अधिकार्यांशी लेखी पत्रव्यवहार आणि समक्ष चर्चा करण्यात आली. तरीही परिस्थितीत काहीही बदल झालेला नाही. उलट वेतनासंबंधी विचारणा केली असता, लेखनिकांकडून उद्धटपणाची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कामगार संघटनेचे अध्यक्ष कॉ. उदय भट म्हणाले, पुणे महापालिका देशातील सर्वाधिक महसूल मिळवणार्या पालिकांपैकी एक असली तरी, तिच्याच शिपाई व रखवालदार कर्मचार्यांना दर महिन्याच्या पगारासाठी धावपळ करावी लागत आहे. दोषी अधिकार्यांवर कडक कारवाई करून पुढे वेतन उशिरा होऊ नये, अशी कर्मचार्यांची मागणी आहे. कर्मचार्यांना येत्या काळात जर वेळेवर पगार दिला नाही तर आम्ही पालिकेसमोर भिक मागो आंदोलन’ करू, असा इशारादेखील भट यांनी दिला.