Wild boar spotted at Taljai Hills Pune
पुणे: तळजाई टेकडी परिसरात रानडुक्कर आढळल्याचा फोटो समाजमाध्यमावर व्हायरल झाला आहे. मात्र जंगली प्राणी कात्रज, सिंहगडच्या जंगलातून शहराकडे येऊ शकतात. नागरिकांनी घाबरू नये.
तळजाई टेकडीचा परिसर सुमारे 108 एकरांवर पसरलेला असून दररोज सकाळी आणि सायंकाळच्या वेळी अनेक नागरिक या टेकडीवर फिरण्यासाठी, व्यायामासाठी येतात. मात्र, या परिसरात रानडुकरांचा वावर असल्याचा फोटो समाजमाध्यमावर प्रसारित झाला. मात्र हा फोटो तळजाई टेकडी भागातील आहे, याबाबत खात्री होऊ शकलेली नाही. यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. (Latest Pune News)
तळजाई टेकडीवर रानडुक्कर असल्याची बातमी सकाळी कळाली. त्यानंतर आम्ही सर्व परिसराची पाहणी केली. परंतु, रानडुक्कर कोठेही आढळून आलेले नाही. वन विभागाचे सर्व कर्मचारी त्याबाबत सर्तक आहेत. रानडुकराच्या कोणत्याही पाऊलखुणा आढळून आलेल्या नाहीत. जे फोटो सोशल मीडियावर फिरत आहेत ते खरंच त्या रानडुकराचे आहेत का, याची पडताळणी केली जात आहे.
- मनोज बोरबेले, वन परिक्षेत्र अधिकारी, भांबुर्डा
तळजाई टेकडीवर रानडुक्कर आल्याची चर्चा दिवसभर सुरू आहे. वास्तविक रानडुक्कर शहरातील टेकडीवर आढळून आले असेल तर पुण्याच्या आसपासच्या परिसरातील पर्यावरण संतुलित आहे, असा त्याचा अर्थ होऊ शकतो. रानडुक्कर टेकडीवर आल्याने कोणीही घाबरण्याची गरज नाही. त्याला कोणत्याही प्रकारची इजा केली नाही तर रानडुक्करही कोणत्याही प्रकारचा हल्ला माणसावर करत नाही. त्याबरोबरच टेकडीला चारही बाजूने संरक्षक भिंत नसल्याने अनेक प्राणी या टेकडीवर येत असतात. त्याचप्रमाणे रानडुक्करही टेकडीवर दिसून आले आहे.
- नीलिमकुमार खैरे, ज्येष्ठ प्राणी अभ्यासक