Balgandharva Theatre Pudhari
पुणे

Pune Theatre Rent Hike: पुण्यातील महापालिका नाट्यगृहांचे भाडे दुप्पट होणार? १३ वर्षांनंतर भाडेवाढीचा प्रस्ताव

बालगंधर्वसह पाच प्रमुख नाट्यगृहांचा समावेश; नाट्यप्रयोगांसाठी अंदाजे ११ हजार रुपये भाडे आकारण्याचे नियोजन

पुढारी वृत्तसेवा

सुवर्णा चव्हाण

पुणे: पुण्यातील महापालिकेच्या नाट्यगृहांमध्ये नाट्यप्रयोग आणि सांस्कृतिक कार्यक्रम करण्याचे भाडे आता दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. गेल्या १३ वर्षांपासून कायम असलेल्या भाड्याच्या दरांमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाने तयार केला आहे. पहिल्या टप्प्यात बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह, गणेश कला क्रीडा रंगमंच आणि विठ्ठलराव तुपे नाट्यगृह या पाच प्रमुख नाट्यगृहांच्या भाड्यात वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

राज्यात पुण्यातील नाट्यगृहांचे भाडे सर्वांत कमी असल्याचे सांगितले जाते. महापालिकेच्या नाट्यगृहांचे भाडे २०१३ मध्ये निश्चित केले होते. त्यानंतर देखभाल, दुरुस्ती आणि व्यवस्थापनाच्या खर्चात मोठी वाढ झाली असली, तरी भाड्यात कोणताही बदल झाला नाही. वीज, स्वच्छता, कर्मचारी, तांत्रिक सुविधा आणि इमारतींची देखभाल, यावरील खर्च वाढत असताना नाट्यगृहांमधून मिळणारे उत्पन्न मात्र जुन्या दरांनुसारच मिळत आहे.

त्यामुळे नाट्यगृहांचे व्यवस्थापन करताना आर्थिक ताण येत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. वाढता खर्च लक्षात घेऊन सांस्कृतिक विभागाने भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे. पहिल्या टप्प्यात सर्वाधिक मागणी असलेल्या पाच नाट्यगृहांचा त्यामध्ये समावेश केला. भाडेवाढ करताना नाट्यसंस्था आणि अन्य कार्यक्रमांचे स्वरूप लक्षात घेऊन स्वतंत्र दर निश्चित करण्याचे नियोजन आहे. नाट्यप्रयोगांना प्राधान्य देत नाट्यसंस्थांसाठी वेगळे दर ठेवले जाणार आहेत. तर मेळावे, पुस्तक प्रदर्शने, खासगी व सांस्कृतिक कार्यक्रम आणि व्यावसायिक कार्यक्रमांसाठी स्वतंत्र भाडे आकारण्याचा विचार आहे. कार्यक्रमाचा प्रकार आणि स्वरूप, यानुसार दर निश्चित करण्याची पद्धत प्रस्तावित आहे. भाडेवाढीचा प्रस्ताव सांस्कृतिक विभागाकडून महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासमोर मांडण्यात येईल, आयुक्तांमार्फत हा प्रस्ताव सक्षम सभेपुढे ठेवण्यात येणार आहे.

भाडेवाढ प्रस्तावित असलेली पाच नाट्यगृहे

बालगंधर्व रंगमंदिर (जंगली महाराज रस्ता), लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृह (पुणे-सातारा रस्ता), यशवंतराव चव्हाण नाट्यगृह (कोथरूड), गणेश कला क्रीडा रंगमंच (स्वारगेट) आणि विठ्ठलराव तुपे नाट्यगृह (हडपसर).

अशी राहणार भाडेवाढ

  • नाट्यगृहांमध्ये सध्याचे भाडे : सोमवार ते शुक्रवार : २५०० ते ३५००, शनिवार-रविवार : ५०००

  • भाडेवाढीनंतर अंदाजे होणार भाडे : नाट्यप्रयोगांसाठी : अंदाजे ११ हजार रुपये, कार्यक्रमांची भाडेवाढ अजून ठरलेली नाही.

नाट्यगृहांच्या देखभाल, दुरुस्ती, वीज, स्वच्छता आणि व्यवस्थापनाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. खासगी सभागृहांच्या तुलनेत महापालिकेच्या नाट्यगृहांचे भाडे आजही कमी आहे. त्यामुळे वाढत्या खर्चाचा विचार करता भाड्याचे दर सुधारणे आवश्यक आहे. नाट्यसंस्थांसाठी आणि अन्य कार्यक्रमांसाठी स्वतंत्र दर ठेवण्याचे नियोजन आहे. नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी नाट्यगृहांच्या महसुली उत्पन्नात वाढ होणे आवश्यक आहे. त्यासाठी भाडेवाढ करणे महत्त्वाचे आहे. प्रस्ताव सोमवारी (दि. १६) सांस्कृतिक विभागाकडून महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासमोर मांडण्यात येईल, आयुक्तामार्फत हा प्रस्ताव सक्षम सभेपुढे ठेवण्यात येणार आहे.
डॉ. संतोष टेंगले, उपायुक्त, सांस्कृतिक विभाग, पुणे महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT