Schools Pudhari
पुणे

Pune Municipal Budget 2026: पुण्यात 75 महापालिका शाळा ‘रोल मॉडेल’; शिक्षण क्षेत्रात मोठा बदल

‘विद्यावर्धिनी’ला नवे बळ; ई-लर्निंग, CBSE संलग्नतेसह आधुनिक शिक्षणावर भर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महानगरपालिकेच्या आगामी 2026-27 च्या अंदाजपत्रकात शिक्षण क्षेत्राला विशेष महत्त्व देत अनेक महत्त्वाकांक्षी उपक्रमांची घोषणा करण्यात आली आहे. शहरातील शिक्षणाचा दर्जा उंचाविण्यासाठी 75 महापालिका शाळा ‌‘रोल मॉडेल‌’ म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यासोबतच ‌‘विद्यावर्धिनी‌’ गुणवत्तावाढ कार्यक्रमालाही नव्याने बळ देण्यात येणार आहे.

स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या धोरणाच्या आधारे शाळांमध्ये आधुनिक पायाभूत सुविधा, प्रशिक्षित शिक्षक व कर्मचारी तसेच विविध शैक्षणिक सुधारणा राबविण्यावर भर दिला जाणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून 75 शाळांना ‌‘रोल मॉडेल‌’चा दर्जा देत त्यांचा सर्वांगीण विकास साधला जाणार आहे. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी आधुनिक सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि नव्या पद्धतींचा अवलंब करण्यात येईल. ‌‘विद्यावर्धिनी‌’ उपक्रमांतर्गत 320 शाळांमध्ये ई-लर्निंग सुविधा, विषयानुसार स्वतंत्र कक्ष, डेटा एन्ट्री ऑपरेटर, क्रीडा व कला विभाग तसेच समुपदेशन सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्याचा प्रयत्न होणार आहे. दरम्यान, महापालिकेच्या आठ इंग््राजी माध्यम शाळांना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) संलग्न करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रम, आधुनिक परीक्षापद्धती आणि सातत्यपूर्ण मूल्यमापनाचा लाभ मिळणार आहे.

योजनांची करणार पुनर्रचना

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विद्यानिकेतन, क्रीडा निकेतन, संगीत अकादमी, शिक्षक सहयोगी दल आणि शिष्यवृत्ती मार्गदर्शन या योजनांची पुनर्रचना करून त्यांना अधिक संघटित स्वरूप देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT