School Pudhari
पुणे

Pune Municipal Schools Upgrade: पुणे महापालिकेच्या 75 शाळांचा ‘आदर्श शाळा’ विकास; 3.14 कोटींच्या खरेदीला मंजुरी

खेळणी खरेदीला मंजुरी मिळाल्यानंतर निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; समाविष्ट गावांतील शाळांसाठी ई-लर्निंगलाही हिरवा कंदील

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महापालिकेच्या शिक्षण विभागातील 75 शाळा ‌‘आदर्श शाळा‌’ म्हणून विकसित करण्याच्या पार्श्वभूमीवर तब्बल 3 कोटी 14 लाख 68 हजार 800 रुपयांच्या खेळणी व शालेय साहित्यखरेदीला अखेर स्थायी समितीने मंजुरी दिली. मात्र, याच प्रस्तावाला काही दिवसांपूर्वी स्थगिती दिली होती. परंतु, आता अचानक मंजुरी देण्यात आल्याने निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महापालिकेच्या गतवर्षीच्या अंदाजपत्रकातील निधीतील तरतुदीवरून आदर्श शाळा म्हणून बालवाडीसाठी 3 कोटी 14 लाखांचे साहित्य खरेदीचा प्रस्ताव भांडार विभागाने मंजुरीसाठी ठेवला होता. या प्रस्तावास दि. 9 एप्रिलला झालेल्या बैठकीत स्थायी समितीने महिनाभरासाठी पुढे ढकलले होते.

शाळांना दोन महिन्यांची उन्हाळी सुटी असणे, तसेच कोणत्या शाळांचा समावेश होणार याबाबत अनिश्चितता असल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. असे असताना प्रशासनाने तातडीची गरज दाखवत आयुक्तांच्या जुन्या प्रस्तावानुसार पुन्हा विषय मांडला आणि त्यास मंजुरी मिळवली. या खरेदीबाबत प्रशासनाने बालवाडीतील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शैक्षणिक खेळणी उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही, निर्णयातील बदलत्या भूमिकेमुळे पारदर्शकतेबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

समाविष्ट गावांतील शाळांना ई-लर्निंगचा लाभ

महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांमधील 65 शाळांमध्ये संगणक कक्ष उभारून ई-लर्निंग सुविधा उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावालाही स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. शिक्षण समितीच्या या प्रस्तावाला अंतिम मान्यता देण्यासाठी तो मुख्य सभेकडे पाठवण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT