पुणे: महापालिकेच्या हद्दीतील रस्त्यांचे झाडणकामाचे कंत्राट हे चिठ्ठी पद्धतीने काढले जात होते. या पद्धतीमुळे एकाच ठेकेदाराला अनेक कामे मिळून कामाच्या दर्जावर परिणाम होत होता. त्यामुळे यापुढे कोणत्याही एका ठेकेदाराला (कंत्राटदाराला) झाडणकामाची जास्तीत जास्त दोनच कामे दिली जातील, असा निर्णय घनकचरा विभागाने घेतल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी दिली. ‘चिठ्ठी पद्धत’ बंद होणार असल्याने आता इतर सर्व लहान-मोठ्या ठेकेदारांना संधी मिळणार आहे.
महानगरपालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत रस्ते झाडणकामासाठी मनुष्यबळ पुरविण्याकरिता निविदा प्रक्रिया राबवली जाते. क्षेत्रीय कार्यालयस्तरावर काढण्यात येणाऱ्या या निविदा चिठ्ठी पद्धतीने काढल्या जात होत्या. या प्रक्रियेमध्ये एकाच ठेकेदाराला अनेक प्रभागांमधील कामांचे कंत्राट मिळत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. यामुळे कामाच्या गुणवत्तेवर देखील परिणाम होत होता.
एकाच ठेकेदाराकडे क्षमतेपेक्षा जास्त आणि अत्याधिक कामांचा भार आल्यामुळे कामांचे योग्य नियोजन करणे, मनुष्यबळ पुरविणे आणि कामाच्या गुणवत्तेवर प्रभावी नियंत्रण ठेवणे कंत्राटदाराला अशक्य होत होते. याचा थेट परिणाम शहराच्या स्वच्छतेवर आणि कामाच्या दर्जावर होत होता. रस्त्यांवर कचरा तसाच पडून राहण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली होती.
एका ठेकेदाराला जास्तीत जास्त दोनच कामे मिळणार
नवीन आदेशानुसार झाडणकामाकरिता मनुष्यबळ पुरविणाऱ्या कोणत्याही ठेकेदाराला दोनपेक्षा अधिक कामे (कंत्राट) देता येणार नाहीत. या निर्णयामुळे कामांचे कंत्राटदारांमार्फत योग्य नियोजन करणे आणि मनुष्यबळाचे प्रभावी व्यवस्थापन करणे सोपे होणार आहे. कामाच्या अतिरिक्त ताणामुळे स्वच्छतेचा दर्जा ढासळणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे नायर यांनी सांगितले.
सर्व कंत्राटदारांना मिळणार समान संधी
महापालिकेच्या या निर्णयामुळे कंत्राट क्षेत्रात नव्याने येऊ इच्छिणाऱ्या आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या इतर ठेकेदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. निविदा प्रक्रियेमध्ये कमालीची पारदर्शकता राहून सर्व कंत्राटदारांना स्पर्धेत उतरण्याची समान संधी उपलब्ध होईल. यामुळे शहराच्या स्वच्छतेचा दर्जाही कायम राखला जाणार आहे.
गेल्या वर्षी रद्द केली होती निविदा प्रक्रिया
झाडणकामासाठी मनुष्यबळ पुरविणे आणि त्यांना किमान वेतन देणे, यासाठी या निविदा काढल्या जातात. एवढेच काम असल्याने आणि यंत्रसामग््राीची आवश्यकता नसल्याने यासाठी सर्वच ठेकेदारांचे दर समान येतात. त्यावर महापालिकेकडून चिठ्ठ्या काढून ठेकेदाराची नियुक्ती केली जाते. मात्र, ठरावीक ठेकेदारांनाच हे काम मिळावे, यासाठी नियम व अटी बदलण्याच्या तक्रारी केल्या जातात. गेल्या वर्षी यामुळेच निविदा प्रक्रिया रद्द केली होती.
ठेकेदारांची मक्तेदारी येणार संपुष्टात
झाडणकामामध्ये ठेकेदाराची जबाबदारी ही मनुष्यबळ पुरविण्याइतपतच मर्यादित असते. परंतु, त्यांच्या कामावर देखरेख ठेवणे, उपस्थिती व कामाचा दर्जा, यावरचे नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी संंबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडेच असते. काहीवेळा दुर्लक्षामुळे तर काही वेळा अर्थपूर्ण संबंधांमुळे मनुष्यबळ कामावर नसतानाही बिले निघतात तसेच कामाची गुणवत्ताही राखली जात नाही. दुसरीकडे एकाच ठेकेदाराला अधिक कामे दिली गेली, तर त्याची मक्तेदारी निर्माण होते. त्याचाही परिणाम कामाच्या दर्जावर होतो. त्यामुळेच महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.
झाडणकामाकरिता मनुष्यबळ पुरविणाऱ्या कोणत्याही ठेकेदाराला दोनपेक्षा अधिक कामे (कंत्राट) देता येणार नाहीत. या निर्णयामुळे कामांचे कंत्राटदारांमार्फत योग्य नियोजन करणे आणि मनुष्यबळाचे प्रभावी व्यवस्थापन करणे सोपे होणार आहे. तसेच, शहराची स्वच्छता देखील आता चांगल्या पद्धतीने होईल, याची काळजी घेतली जाणार आहे.प्रजित नायर, अतिरिक्त आयुक्त, महापालिका