पुणे: शहर झाडून स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेने मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आणि यंत्रणा वाढवली; परंतु ज्या रस्त्यांवर झाडूकाम करायचे त्यांचे मॅपिंग करतानाच प्रशासनाच्या नियोजनाचा फज्जा उडाल्याचे समोर आले आहे.
शहरातील रस्त्यांची प्रत्यक्ष लांबी २ हजार ३९६ किलोमीटर असताना झाडूकामाच्या मॅपिंगमध्ये तब्बल साडेआठ हजार किलोमीटर रस्ते दाखवण्यात आले आहेत. त्यात मोठ्या सोसायट्यांमधील अंतर्गत खासगी रस्त्यांचाही समावेश झाल्याचे निदर्शनास आल्याने आता हे मॅपिंगच पुन्हा तपासण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली आहे.
शहर स्वच्छतेसाठी 'परफॉर्मन्स बेस्ड' पद्धतीने झाडूकामाचा प्रायोगिक उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याअंतर्गत झाडूकामाच्या ठेकेदारांकडील कर्मचाऱ्यांची संख्या साडेचार हजारांवरून थेट नऊ हजार करण्यात आली. झाडूकामासाठी हद्द निश्चित करताना प्रत्येक ७०० मीटरच्या क्षेत्रानुसार मनुष्यबळ निश्चित करण्यात आले.
मात्र, हद्द निश्चित करण्यापूर्वी रस्त्यांची अचूक मोजणी आणि वर्गवारी करण्यात प्रशासनाला अपयश आल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
रस्त्यांचे मॅपिंग करताना सार्वजनिक रस्त्यांसोबतच मोठ्या सोसायट्यांमधील अंतर्गत खासगी रस्तेही समाविष्ट झाले. याशिवाय काही रस्त्यांची दुबार मोजणी झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे आधी केलेल्या मॅपिंगची पुन्हा पडताळणी करून खासगी तसेच दुबार मोजणी झालेले रस्ते वगळण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
विशेष म्हणजे, तीन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या या उपक्रमामुळे सार्वजनिक स्वच्छतेत सुधारणा झाल्याचा दावा बैठकीत करण्यात आला.
मात्र, त्याच बैठकीत मॅपिंगमध्ये खासगी रस्त्यांचा समावेश झाल्याची बाब मान्य करण्यात आली. त्यानंतर सुधारित हद्दी निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे नेमक्या किती किलोमीटर रस्त्यांसाठी किती मनुष्यबळ आणि किती खर्च निश्चित करण्यात आला, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मॅपिंग केलेल्या रस्त्यांची पुन्हा पाहणी करून खासगी रस्ते वगळण्यासह दुबार मोजणी झालेले रस्ते कमी करण्यास सांगण्यात आले आहे. सुधारित रस्त्यांची आकडेवारी पाच दिवसांत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे सुरुवातीला मॅपिंगमध्ये दाखवलेली साडेआठ हजार किलोमीटरची आकडेवारी कितपत अचूक होती, याची तपासणी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
शहराच्या स्वच्छतेसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असताना रस्त्यांची मोजणी, मॅपिंग आणि मनुष्यबळाचे नियोजन या मूलभूत बाबींमध्येच गोंधळ होत असेल, तर 'परफॉर्मन्स बेस्ड' झाडूकामाच्या कार्यक्षमतेबाबत प्रशासनाकडून करण्यात येणारा दावा कितपत खरा आहे, याची चौकशी करण्याची गरज आहे.
कित्येक कायमस्वरूपी सफाई सेवक वर्षानुवर्षे गैरहजर
महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अनेक कायमस्वरूपी सफाई सेवक वर्षानुवर्षे गैरहजर असल्याचेही बैठकीत समोर आले. पाच वर्षांहून अधिक काळ सलग गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांवर बदली किंवा बडतर्फीची कारवाई करण्याचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
एकीकडे कायमस्वरूपी कर्मचारी गैरहजर असताना दुसरीकडे ठेकेदारांकडील मनुष्यबळ दुप्पट करण्याची वेळ प्रशासनावर का आली, असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे.
मॅपिंगच्या फेरतपासणीचे आदेश
शहरातील प्रत्यक्ष रस्ते : सुमारे २३९६ कि.मी.
झाडूकामाच्या मॅपिंगमध्ये दाखवलेले रस्ते : साडेआठ हजार कि.मी.
झाडूकामासाठी कर्मचाऱ्यांची संख्या : साडेचार हजारांवरून ९ हजार
हद्द निश्चिती : प्रत्येक ७०० मीटरनुसार
मॅपिंगमधील खासगी व दुबार रस्ते वगळणार
सुधारित रस्त्यांची आकडेवारी पाच दिवसांत सादर करण्याचे आदेश