निनाद देशमुख, गजानन शुक्ला
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत मंगळवारी जाहीर झाली. या आरक्षण सोडतीत अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे. काहींचा पत्ता कट झाला आहे, तर काहींना आरक्षणाशिवाय सर्वसाधारण प्रवर्गातून निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागणार आहे. काहींना घरातील महिलांना उमेदवारीची संधी द्यावी लागणार आहे. काही प्रभागांत महत्त्वाचे नेते समोरासमोर आले आहेत, तर काही ठिकाणी प्रभागांच्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. आरक्षण सोडतीत प्रभाग अनुकूल झाल्याने अनेकांनी जल्लोष करीत निवडणुकीच्या तयारीला देखील सुरुवात केली आहे.(Latest Pune News)
पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत अखेर जाहीर झाली. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमावलीनुसार आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत पार पडली. महापालिका हद्दीतील 41 प्रभागांनुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय तसेच महिलांसाठी राखीव जागा आणि सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण निश्चित करण्यात आले. एकूण 165 जागांपैकी 83 जागा महिलांसाठी राखीव आहेत, तर अनुसूचित जातींसाठी 22, अनुसूचित जमातींसाठी 2 व ओबीसीसाठी 44 जागा राखीव आहेत. खुल्या प्रवर्गाच्या 97 जागांपैकी 49 जागा महिलांसाठी राखीव आहेत.
या आरक्षण सोडतीत पुण्यातील अनेक दिग्गजांना फटका बसला आहे. आरक्षण सोडतीनंतर अनेक माजी नगरसेवकांच्या जागा अडचणीत आल्या आहेत. आरक्षण जाहीर झाल्यामुळे आता गेल्या निवडणुकीत राखीव गटातून निवडून आलेल्या अनेक माजी नगरसेवकांना सर्वसाधारण गटातून निवडणूक लढवावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, माजी नगरसेवक अविनाश बागवे, युवराज बेलदरे यांना आता सर्वसाधारण गटातून निवडणूक लढवावी लागणार आहे. प्रभाग क्रमांक 8 औंध बोपोडीमध्ये एकच जागा सर्वसाधारण गटासाठी शिल्लक आहे. येथून माजी नगरसेवक सनी निम्हण, प्रकाश ढोरे,आनंद छाजेड अशी इच्छुकांची मोठी संख्या असल्याने भाजपला येथून उमेदवारी देताना कस लागणार आहे. (पान 4 वर)
प्रभाग क्रमांक 38 हा शहरातील सर्वांत मोठा प्रभाग असून, या प्रभागामधून पाच सदस्य निवडून येणार आहेत. येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला, सर्वसाधारण महिला दोन, सर्वसाधारण एक असे आरक्षण पडले आहे. या प्रभागातून सात माजी नगरसेवक तर तीन सरपंच लढण्यास इच्छुक आहेत. यात दत्ता धनकवडे, राणी भोसले, प्रकाश कदम, युवराज बेलदरे, अमृता बाबर, स्मिता कोंढरे, वसंत मोरे हे सात माजी नगरसेवक तर व्यंकोजी खोपडे, अनिल कोंढरे, संतोष ताठे आणि अरुण राजवाडे, वनिता जांभळे, राणी बेलदरे हे माजी सरपंच इच्छुक आहेत. त्यामुळे या प्रभागात चुरशीची लढत होणार आहे. वसंत मोरे हे यंदाच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 38 ई मधून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. तर प्रभाग क्रमांक 40 ड मधून त्यांचा मुलगा देखील रिंगणात उतरणार आहे.
दोन्ही महापौर आणि सहा आमदार सभागृहात नसतील आरक्षण सोडतीमध्ये यापूर्वीच्या सभागृहातील तीन उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सरस्वती शेंडगे आणि सुनीता वाडेकर यांच्या प्रभागातील अनुसूचित जातीसाठीच्या जागा अनुक्रमे महिला आणि खुल्या गटासाठी राखीव झाल्या. त्यामुळे हे तिघेही अडचणीत आले आहेत. त्यांच्या कुटुंबातील महिला अथवा पुरुषांना संधी मिळू शकते. ते खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढवू शकतात. 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीनंतर मुक्ता टिळक आणि मुरलीधर मोहोळ महापौर झाले होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मुक्ता टिळक या कसबा विधानसभा मतदारसंघातून आमदार झाल्या. दुर्दैवाने त्यांचे निधन झाले, तर मागील वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोहोळ हे खासदार आणि केंद्रात मंत्री झाले. त्यामुळे मागील टर्मचे दोन्ही महापौर देखील सभागृहात दिसणार नाहीत.
हडपसर येथील प्रभागात प्रामुख्याने भाजप विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट असा सामना रंगणार आहे. प्रभाग क्रमांक 16 हडपसर-सातववाडी येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, साधारण महिला व सर्वसाधारण दोन असे आरक्षण पडले आहे. त्यामुळे येथे आमदार चेतन तुपे यांचा मुलगा निशांत तुपे याला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर प्रभाग क्रमांक 17 रामटेकडी-वैदुवाडी-माळवाडी येथे देखील राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध भाजप असा सामना रंगण्याची शक्यता आहे.
2017 नंतर दोनवेळा विधानसभा निवडणूक झाली. त्या वेळी नगरसेवक असलेले सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, चेतन तुपे, सुनील टिंगरे, हेमंत रासने हे देखील आमदार झाले आहेत, तर कसबा पोटनिवडणुकीत आमदार झालेले रवींद्र धंगेकर हे लोकसभा व विधानसभा निवडणूक लढले; परंतु दोन्ही वेळा त्यांचा पराभव झाला. त्यामुळे ते पुन्हा महापालिका निवडणूक लढवतील, याची जवळपास शक्यता नाही.
प्रमुख पक्षांचे शहराध्यक्ष यांना या आरक्षण सोडतीत त्यांचे प्रभाग अनुकूल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नवी पेठ पर्वती येथून भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांना हा प्रभाग अनुकूल झाला आहे. तर कॉंग्रेसचे अरविंद शिंदे यांना रविवार पेठ-नाना पेठ या प्रभागात एक जागा सर्वसाधारण गटासाठी राखीव राहिल्याने त्यांच्यासाठी देखील हा प्रभाग अनुकूल झाला आहे, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा वानवडी-साळुंखे विहार हा प्रभाग देखील त्यांना अनुकूल झाला आहे. गेल्या वेळी त्यांच्यासह त्यांची आई रत्नप्रभा जगताप यादेखील येथून निवडून आल्या होत्या.