

नितीन वाबळे
प्रभाग क्रमांक - 14 कोरेगाव पार्क-घोरपडी-मुंढवा
कोरेगाव पार्क-घोरपडी हा पूर्वीचा प्रभाग क्र. 21, आता प्रभाग क्र. 14 (कोरेगाव पार्क-घोरपडी-मुंढवा) झाला आहे. यात मुंढव्याचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. 2017 ते 2022 या पाच वर्षांच्या कालावधीत प्रभाग 21 मध्ये सुमारे 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त विकास निधी आला होता. मात्र, एकही नजरेस भरण्यासारखे काम झाले नाही तसेच क्रीडांगणाचे रखडलेले काम, वाहतूक कोंडी, घोरपडीतील महापालिकेच्या दवाखान्यात सुविधांचा अभाव, यासह विविध समस्या अद्यापही कायम असल्याचे नागरिकांनी सांगितले.(Latest Pune News)
प्रभागात समावेश असलेल्या कोरेगाव पार्क, घोरपडी आणि मुंढवा या भागांत अनेक नागरी समस्या आजही ‘जैसे थे’च आहेत. प्रभागात अनेक ठिकाणी अंतर्गत रस्त्यांची आणि ड्रेनेजलाइनची दुरवस्था झाली आहे. अनियमित आणि कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्याविषयी महापालिका प्रशासनाकडे अनेकवेळा तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याची खंत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
2017 ते 2022 या पाच वर्षांच्या काळात प्रभागाच्या विकासासाठी तत्कालीन नगरसेवकांकडून आवश्यक ते प्रयत्न न झाल्याने येथील अनेक विकासकामे मार्गी लागली नसल्याचे नागरिक सांगत आहेत. मुंढवा आणि मगरपट्टा चौक येथे महापालिकेचा सर्व सोयीसुविधा असलेला दवाखाना आहे. मात्र, घोरपडी येथे महापालिकेच्या दवाखान्यात विविध सुविधांचा अभाव असल्याने सर्वसामान्य नागरिकांना खासगी दवाखान्यांमध्ये उपचार घ्यावे लागत आहेत.\
बी. टी. कवडे रोड येथील बाळासाहेब कवडे क्रीडांगणासाठी मागील काही वर्षांत महापालिकेने लाखो रुपये निधी खर्च केला आहे. तरीही हे क्रीडांगण अद्याप पूर्णक्षमतेने सुरू झालेले नाही. भारत फोर्ज कंपनी आणि बालाजीनगर, अशा दोन ठिकाणी मंडईसाठी जागा आरक्षित आहे. मात्र, त्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे भाजीपाला खरेदीसाठी घोरपडीतील नागरिकांना इतरत्र जावे लागत आहे.
कोरेगाव पार्क येथील नॉर्थ मेन रोड आणि साऊथ मेन रोड या दोन रस्त्यांवर सतत नागरिकांची वर्दळ असते. या रस्त्यांवर अतिक्रमणे झाली आहेत. तसेच, लेन नंबर 1 ते 7 मधील रस्ते अरुंद असून, या रस्त्यांच्या कडेला वाहनांचे पार्किंग केले जात असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच, मुख्य रस्त्यांवर पावसाळी वाहिन्या नसल्याने पावसाचे पाणी साचून राहत आहे. तसेच, पदपथांची देखील दुरवस्था झाली आहे. कवडेवाडी येथील गोफणे क्रीडांगण धूळ खात पडले असून, परिसरात सर्वत्र गवत उगवले आहे. क्रीडांगणात फक्त रंगरंगोटीसाठी निधी वापरला जात असल्याचे नागरिकांनी सांगितले. शाहू मोडक व वागसकर या दोन्हीही उद्यानांमध्येही आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे.
गेल्या काळात मुंढवा येथे एकही मोठे विकासकाम झालेले नाही. क्रीडांगणासाठी जागा नाही तसेच कुठेही उद्यान नाही. ताडीगुत्ता चौक ते महात्मा फुले चौक या मुख्य रस्त्यावरील पदपथांची गेल्या तीन-चार वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. ताडीगुत्ता चौक ते रेल्वे स्टेशन आणि तेथून मुंढवा या रस्त्याचे रुंदीकरण मागील अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. महात्मा फुले चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी या ठिकाणी उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग करण्याची मागणी सुमारे वीस वर्षांपासून होत आहे. मात्र, लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
घोरपडी येथील बी. टी. कवडे रोड, कला शंकरनगर, ज्ञानेश्वर पार्क, कृष्णाईनगर, तारादत्त कॉलनी, शिवदत्त कॉलनी, दळवीनगर, निगडेनगर, श्रीनाथनगर, श्रावस्तीनगर, बालाजीनगर, विकासनगर, पंचशीलनगर, ढवळेवस्ती, मिलिंदनगर, भीमनगर, शिंदेवस्ती, जहांगीरनगर, मगरपट्टा सिटीचा काही भाग, मुंढवा येथील धायरकरवस्ती, सर्वोदय कॉलनी, रासगे आळी, पिंगळेवस्ती, मुंढवा गावठाण, कोरेगाव पार्क येथील दरवडेवस्ती, राजीव गांधीनगर, गाडगे महाराज वसाहत, रेणुकावस्ती, मदारीवस्ती, दरवडेमळा.
बी. टी. कवडे रोड येथील महापालिकेच्या क्रीडांगणाचे काम रखडले आहे.
भारत फोर्ज ते भीमनगर-जहांगीरनगर रस्ता अरुंद असल्यामुळे वाहतुकीस अडथळा
घोरपडी येथे महापालिकेच्या दवाखान्यात सुविधांचा अभाव
मुंढवा येथे महापालिकेचे एकही क्रीडांगण किंवा उद्यान नाही
कोरेगाव पार्क येथील साऊथ मेड रोड व नॉर्थ मेन रोडवर पावसाळी वाहिन्यांचा अभाव
घोरपडी येथील थोपटे चौकातील उड्डाणपूल
भारत फोर्ज कंपनीच्या पाठीमागील रेल्वे उड्डाणपूल
घोरपडी येथे अग्निशमन केंद्राची उभारणी
बी. टी. कवडे रोड येथील महापालिकेचा बंद असलेला दवाखाना सुरू
पिंगळेवस्तीपासून कोरेगाव पार्क रस्त्याला जोडणाऱ्या मार्गाचे काम पूर्ण
घोरपडी येथे अग्निशमन केंद्राची इमारत उभारली.
सप्तगिरी बालाजी बाल क्रीडांगण अद्ययावत केले.
घोरपडी येथील बंद असलेले महापालिकेचे आरोग्य केंद्र सुरू करून तेथे नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा सुरू केल्या. कोरेगाव पार्क येथील स्मशानभूमीसाठी निधी मंजूर केला तसेच नॉर्थ मेन रोडच्या रुंदीकरणाच्या कामासाठी प्रयत्न केले.
मंगला मंत्री, माजी नगरसेविका
घोरपडी येथे पाण्याच्या टाक्यांची कामे पूर्ण केली. भारत फोर्ज येथील रस्त्याचे काँक्रिटीकरण, कोरेगाव पार्क येथील महापालिकेच्या दवाखान्याचे विस्तारीकरण, नॉर्थ मेन रोडच्या रुंदीकरणास सुरुवात आदी कामे केली आहेत. तसेच, दरवर्षी गणेश विसर्जनावेळी एक लाख नागरिकांसाठी महाप्रसाद, दिवाळीनिमित्त प्रभागातील नागरिकांना रेशन किट आणि सोसायट्यांमधील नागरिकांना भेटवस्तूंचे वाटप केले जात आहे.
उमेश गायकवाड, माजी नगरसेवक
प्रभागातील अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत. मोफत रुग्णवाहिका, शववाहिका, जेटिंग मशिन आदीची उपलब्धता करण्यात आली आहे. कस्तुरबा गांधी विद्यालयाच्या इमारतीचा एक मजला बांधल्यामुळे विद्यार्थिसंख्येत वाढ झाली आहे. वाचनालयांचे नूतनीकरण, श्रावस्तीनगर येथे पोलिस चौकीचे बांधकाम तसेच सोपानबाग येथील नवीन कालव्यावर गणेश विसर्जन घाट बांधण्यात आला आहे.
किशोर धायरकर (माजी नगरसेविका कै. लता धायरकर यांचे चिरंजीव)