Face Recognition Pudhari
पुणे

Pune Face Recognition Attendance: “आता हजेरी नाही, थेट AI मॉनिटरिंग!” पुणे महापालिकेत सफाई कर्मचाऱ्यांवर डिजिटल नजर

फेस रिकग्निशन आणि जिओ फेन्सिंग प्रणालीद्वारे उपस्थिती व कामकाजावर कडक नियंत्रण; बनावट हजेरी व गैरहजेरीवर बसणार अंकुश

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महापालिकेतील कायमस्वरूपी आणि कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर तसेच प्रत्यक्ष कामकाजावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने आता डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. गैरहजेरी, बनावट हजेरी आणि प्रत्यक्ष काम न करता वेतन घेण्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने फेस रिकग्निशन आणि जिओ फेन्सिंग आधारित विशेष यंत्रणा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत एचएमएस संस्थेच्या सहकार्याने विशेष मोबाईल ॲप विकसित केले असून, त्यामध्ये शहरातील दहा हजारांहून अधिक कायम व कंत्राटी सफाईसेवकांची नोंदणी केली आहे. या ॲपद्वारे सफाई कर्मचाऱ्यांची दैनंदिन उपस्थिती फेस रिकग्निशन प्रणालीद्वारे नोंदवली जाणार आहे.

याशिवाय, शहरातील 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील सर्व झाडणकामाच्या मार्गांचे आणि स्वच्छता क्षेत्रांचे जिओ फेन्सिंग केले आहे. संबंधित कर्मचारी नियुक्त केलेल्या परिसरात प्रत्यक्ष उपस्थित राहून काम करत आहेत का? यावर डिजिटल पद्धतीने नजर ठेवली जाणार आहे. त्यामुळे केवळ हजेरी लावून अनुपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अंकुश बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, आता सफाईसेवकांचे वेतन केवळ उपस्थितीवर नव्हे, तर जिओ फेन्स केलेल्या झाडण हद्दीतील प्रत्यक्ष कामाच्या दैनंदिन अहवालाच्या आधारेच अदा करण्यात येणार आहे. फेस रिकग्निशन आणि जिओ फेन्सिंग अहवालानुसारच कायम व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन निश्चित केले जाईल. याबाबत अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी संबंधित आदेश जारी केले आहेत.

दरम्यान, स्वच्छता व्यवस्थेतील जबाबदारी अधिक काटेकोर करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांच्या सहाय्यक आयुक्तांनाही सकाळी 7 ते 9.30 या वेळेत त्यांच्या हद्दीत फिरून स्वच्छतेच्या कामाचा आढावा घेणे बंधनकारक केले आहे. त्यांच्या क्षेत्रातील स्वच्छतेची जबाबदारी निश्चित केली असून, कामात त्रुटी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे. महापालिका आयुक्त क्षेत्रनिहाय कामाचा आढावा घेणार असल्याने सहायक आयुक्तांना नियमित अहवाल सादर करावा लागणार आहे.

झाडणकाम, ड्रेनेज सफाई करणारे बिगारी, या कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. त्यांच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी व काम करून घेण्यासाठी दर 15 ते 20 कर्मचाऱ्यांमागे एक मुकादम व निरीक्षकाची (एसआय) नेमणूक केली जाते. या कर्मचाऱ्याचे काम पहाटेपासून सुरू होत असल्याने त्यांची हजेरी मस्टर पद्धतीने नोंदविली जाते. मात्र, याचा फायदा घेऊन अनेक जण कामावर न जाताच पगार घेत असल्याचे प्रकार उघडकीस आले होते.महापालिकेने झाडणकाम करणाऱ्या महपालिकेच्या व कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांसाठी फेस रिकग्निशन आणि जिओ फेन्सिंग आधारित विशेष यंत्रणा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व 10 हजार कर्मचाऱ्यांचे रजिस्ट्रेशन पूर्ण केले आहे. या नव्या यंत्रणेमुळे आता कामचुकार कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवता येणार आहे. ही प्रणाली मंगळवारपासून लागू केली आहे.
संतोष वारुळे, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT