पुणे: पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीत गुरुवारी (दि. 4) दिवसभरात दोन कर्मचाऱ्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची धक्कादायक घटना घडली. इमारतीसमोर रुग्णवाहिका उपलब्ध असली तरी त्यामध्ये डॉक्टरच नव्हते.
या कमतरतेमुळे तातडीच्या उपचारात विलंब झाल्याने एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या महिला कर्मचाऱ्याला तातडीने दवाखान्यात भरती करण्यात आल्याने त्या बचवल्या.
गुरुवारी सकाळी 11.30 वाजता पथविभागात कार्यरत असलेल्या शिपाई अशोक दशरथ वाळके (वय 58) यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. इमारतीतील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले. मात्र पुढील उपचारासाठी त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.
चार तासांनंतर त्यांचे दुर्दैवी निधन झाले. यानंतर दुपारी अंदाजे 3.30 वाजता अकाउंट विभागातील कर्मचारी छाया सूर्यवंशी यांनाही हृदयविकाराचा झटका आला. त्यांना त्वरित प्राथमिक उपचार देऊन रुग्णालयात दाखल केले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.
महापालिकेच्या मुख्य इमारतीत अधिकारी-कर्मचारी तसेच रोज शेकडो नागरिकांची वर्दळ असल्याने कायमस्वरूपी सुसज्ज रुग्णवाहिका आणि कार्यालयीन वेळेत किमान एक डॉक्टर उपलब्ध असावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. रुग्णवाहिका इमारतीत असते, मात्र ती कार्डिॲक ॲम्ब्युलन्स नसल्याने तसेच डॉक्टर उपलब्ध नसल्याने आजच्या घटनांनी प्रणालीतील ही गंभीर उणीव पुन्हा एकदा समोर आणली. या घटनेमुळे मुख्यालयात एक लहान परंतु सुसज्ज आरोग्य केंद्र कायमस्वरूपी सुरू करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.