पुणे: महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. लोकशाहीच्या या महत्त्वाच्या प्रक्रियेत शहरातील प्रत्येक मतदाराला मतदानाचा हक्क सुलभपणे बजावता यावा, यासाठी महापालिका आणि निवडणूक यंत्रणेने सूक्ष्म नियोजन केले आहे.
या निवडणुकीत एकूण 35 लाख 51 हजार 954 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, त्यांच्यासाठी 918 विविध ठिकाणी तब्बल 4 हजार 4 मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. यामध्ये शाळा, महाविद्यालये, सोसायट्या तसेच सार्वजनिक इमारतींचा समावेश आहे. प्रत्येक प्रभागातील लोकसंख्या, मतदारांची संख्या आणि भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन मतदान केंद्रांची आखणी केली आहे, अशी माहिती निवडणूक अधिकारी प्रसाद काटकर यांनी दिली.
पुणे महापालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान, तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी व अंतिम निकाल जाहीर होणार आहे. महापालिकेच्या निवडणूक विभागाने मतदार यादी अंतिम केली आहे. या मतदारांना मतदान करण्यासाठी पाच परिमंडळांतील 15 क्षेत्रीय कार्यालयानुसार 918 ठिकाणी 4004 मतदान केंद्रे निश्चित केली आहेत. मतदानप्रक्रियेत कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
रॅम्प, व्हीलचेअर, पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालये तसेच स्पष्ट दिशादर्शक फलक लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच गर्दी टाळण्यासाठी आणि मतदान सुरळीत पार पडावे यासाठी प्रत्येक केंद्रावर पुरेसे मतदान अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असून, इच्छुक उमेदवार, प्रचारयंत्रणा आणि रणनीती आखण्याला वेग आला आहे. प्रशासकीय तयारी पूर्ण झाल्यामुळे आता सर्वांचे लक्ष प्रत्यक्ष निवडणूक रणधुमाळीकडे लागले आहे.
संवेदनशील मतदान
केंद्रांवर विशेष बंदोबस्त शहरातील वाढती लोकसंख्या, नव्याने समाविष्ट झालेली गावे आणि बदललेली प्रभागरचना लक्षात घेता ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाशी समन्वय साधण्यात आला असून, संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.