पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून, यासाठी मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 रोजी अस्तित्वात असलेली महाराष्ट्र विधानसभेची मतदार यादी मुख्य मतदार यादी म्हणून वापरण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ज्यांची नावे 1 जुलै 2025 पर्यंत नोंदवली गेली आहेथ, त्यांनाच महापालिका निवडणुकांसाठी मतदान करता येणार आहे.(Latest Pune News)
आगामी महापालिका निवडणुकीसाठी पुणे महानगरपालिकेची अंतिम प्रभागरचना जाहीर करण्यात आली आहे. आता सर्वांचे लक्ष प्रभागनिहाय आरक्षणाच्या सोडतीकडे लागले आहे. निवडणूक आयोगामार्फत निवडणुकीची तयारी वेगाने सुरू करण्यात आली आहे. यासाठी स्वतंत्र कक्षाची नेमणूक करण्यात आली असून, मतदार यादी तयार करण्यासाठी दोन उपयुक्तांची देखील नेमणूक करण्यात आली आहे.
मतदार यादी तयार करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व महानगरपालिकांना मतदार यादीचे विशेष संकेतस्थळ उपलब्ध करून दिले असून, प्रत्येक महानगरपालिकेला त्यासाठी स्वतंत्र युजर आयडी आणि पासवर्ड देखील दिले आहेत. संबंधित महानगरपालिका प्रशासनाने आपापल्या हद्दीतील विधानसभा मतदारसंघातील भाग क्रमांकानुसार यादी डाउनलोड करून मुख्य मतदार यादी तयार करावी, असे स्पष्ट निर्देश देखील आयोगाने दिले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव प्रदीप परब यांनी जारी केलेल्या पत्रानुसार, 10 ते 14 ऑक्टोबर 2025 या कालावधीत मुख्य मतदार यादी डाउनलोड करण्याचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर प्रभागनिहाय मतदार यादी तयार करून मतदार यादीची पूर्वतयारी पूर्ण करण्यात येणार आहे.
या संदर्भात शुक्रवारी (दि. 10) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व महानगरपालिकांच्या उपायुक्त, सहाय्यक आयुक्त व संगणक तज्ञांची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. प्रत्येक महानगरपालिकेतून दोन ते तीन अधिकारी/कर्मचारी यांना या बैठकीस उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.