पुणे: उमेदवारांच्या प्रचारांच्या रील्स, प्रचार मोहिमांची छायाचित्रे, प्रचार सभांचे फेसबुक लाइव्ह अन् प्रचार फेऱ्यांचे व्हिडीओ... अशा पद्धतीने सोशल मीडियावर उमेदवारांचा हायटेक प्रचार सुरू आहे अन् यामागे आहेत उमेदवारांसाठी काम करणाऱ्या वेगवेगळ्या एजन्सी आणि एजन्सीमधील कर्मचारी. प्रचारसभा असो वा प्रचारफेरी... प्रत्येकाचे लाइव्ह अपडेट्स आणि सोशल मीडियावर प्रचारासाठी उमेदवारांकडून सोशल मीडिया एजन्सीची मदत घेण्यात येत आहे, तर अगदी एलईडी स्क्रीन असलेल्या व्हॅन्स, रिक्षावर ऑडिओ क्लिप्सद्वारे होणारा प्रचार आणि जनसंपर्काचे कामही एजन्सींकडून होत आहे.
एका उमेदवाराच्या प्रचारासाठी तीन ते चार एजन्सीज काम करत असून, उमेदवारांच्या भन्नाट प्रचारासाठी एजन्सींमधील कौशल्याचे हात म्हणजेच एजन्सींमधील कर्मचारी रात्रंदिवस काम करीत आहेत. पुण्यातील अनेक एजन्सी उमेदवारांसाठी काम करीत असून, उमेदवारांचा प्रचार यामुळे सोपा झाला आहे, त्याचा फायदाही उमेदवारांना होताना दिसत आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी उमेदवारांनी वेगवेगळ्या एजन्सीज्ची मदत घेतली आहे. कोणी सोशल मीडियाचा प्रचार हाताळतोय... तर कोणी एलईडी स्क्रीन्सद्वारे प्रचार... कोणी होर्डिंगद्वारे प्रचाराची जबाबदारी सांभाळत आहे, तर कोणी कंटेट पुरविण्याची... निवडणुकीच्या रणधुमाळीत सध्या पारंपरिक प्रचाराच्या जोडीला आता वेगवेगळ्या एजन्सींची मदत घेतली जात असून, उमेदवारांच्या प्रचारासाठी एकाच वेळी तीन ते चार एजन्सीज काम करत आहेत. पुण्यातील विविध उमेदवारांनी अशा एजन्सींकडे काम दिले आहे. उमेदवारांचे सोशल मीडिया, कंटेट पुरविणारे, डिजिटल व्यासपीठ, पीआर, होर्डिंग, एलईडी स्क्रीन्स असलेल्या व्हॅन, पथनाट्याचे सादरीकरण... अशा विविध स्वरूपांचे काम एजन्सींकडे देण्यात आले आहे.
याविषयी एका एजन्सीचे संचालक वैभव लामतुरे म्हणाले, मागील काही निवडणुका पाहिल्या तर सध्या उमेदवारांच्या प्रचारासाठी वेगवेगळ्या एजन्सींची मदत घेण्याचा ट्रेंड सुरू आहे. सोशल मीडियापासून ते कंटेट पुरविणाऱ्या एजन्सीपर्यंत... अशा वेगवेगळ्या एजन्सी काम करत आहेत. एजन्सींच्या मदतीमुळे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे सोपे होत आहे.
उमेदवारांचा प्रचार जोमाने सुरू
मतदारांना ऑडीओ कॉल लावणे, ऑडीओ क्लिप्स पाठविणे, प्रचारसभांचे लाइव्ह करणे, सोशल मीडियावर रील्स अपलोड करणे, छायाचित्रे- व्हिडीओ अपलोड करणे, कंटेट पोस्ट करणे... असे काम एजन्सींद्वारे केले जात आहे. यामध्ये सोशल मीडिया हाताळणाऱ्या एजन्सींची संख्या जास्त आहे. उमेदवारांची सोशल मीडिया टीम प्रचाराची जबाबदारी सांभाळत असून, प्रचारसभेपासून ते मतदारांशी भेटीगाठीची क्षणचित्रे लगेच पोस्ट केले जात आहेत. एवढेच नव्हे, तर प्रचारसभांचे लाइव्ह करणे असो वा रील्स... हेही क्षणांत होत असून, एजन्सींमुळे उमेदवारांचा प्रचार जोमाने सुरू आहे.