पुणे: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि. 15) शहरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहर, उपनगरात 12 हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात केला असून, 90 संवेदनशील मतदान केंद्रावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात राहणार आहे. अनुचित घटना रोखण्यासाठी शीघ कृती दल (क्विक रिस्पॉन्स टीम), वरिष्ठ अधिकाऱ्यांसह विशेष पथक गस्त घालणार आहेत.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख, मनोज पाटील, राजेश बनसोडे, संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आदेश दिल्यानुसार, शहरात कडक बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. मतदान सुरू असताना शहरातील सर्व घडामोडींचा आढावा वरिष्ठ पोलिस अधिकारी घेणार आहे. अनुचित घटना किंवा प्रकार घडल्यास त्वरीत तेथे पोलिस पोहोचतील, अशा पद्धतीने बंदोबस्ताची आखणी केली आहे.
पुणे शहर, उपनगरात तीन हजार 983 मतदान केद्रे (बूथ) आहेत. प्रत्येक केंद्रावर एक पोलिस कर्मचारी राहणार आहेत. शहरातील 913 इमारतीत मतदान होणार आहे. तेथे दोन पोलीस कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्राच्या परिसरात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिस निरीक्षक गस्त घालणार आहेत. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी स्थानिक पोलिसांचा बंदोबस्तासह गुन्हे शाखेचे पथके तैनात केली जाणार आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी तीन हजार 439 प्रतिबंधात्मक कारवाया झाल्या आहेत. शहरात 14 पोलिस उपायुक्त, 30 सहायक पोलिस आयुक्त, 166 पोलिस निरीक्षक, 723 सहायक पोलिस निरीक्षक, 12,500 पोलीस कर्मचारी असा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. गृहरक्षक दलाचे तीन हजार 250 जवान, राज्य राखीव पोलिस दलाच्या चार तुकड्या तैनात केल्या आहेत.
26 लाखांचे अमली पदार्थ जप्त
अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाया करण्यात आल्या आहेत. मेफेड्रोन, गांजा, चरस, नशेच्या गोळ्या असे 26 लाख 84 हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. मतदारांना चांदीच्या वस्तू, पैशांचे वाटप प्रकरणी पोलिसांनी 17 गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी दोन लाख सहा हजार 350 रुपये जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गैरप्रकारांवर पोलिसांची नजर
निवडणूक प्रक्रियेत 18 स्थिर, 15 फिरती पथके, व्हिडीओ शु टिंग करणारी 15 पथके तयार करण्यात आली आहेत. पोलिसांनी आतापर्यंत 67 लाखांची रोकड जप्त केली आहे. तीन हजार 439 प्रतिबंधात्मक कारवाया केल्या आहेत. दारूबंदी कायद्यान्वये 179 गुन्हे दाखल करण्यात आले असून, एक कोटी 23 लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.