पुणे: तब्बल साडेतीन वर्षांपासून रखडलेल्या महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीला मंगळवार (दि 23) पासून प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात करण्यात येणार असून, यासाठी महापालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. निवडणूक पारदर्शक, सुरळीत आणि वेळेत पार पडावी यासाठी महापालिकेची संपूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर काम करीत असून, निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. क्षेत्रीय कार्यालयानुसार 15 उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी केली आहे.
महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचना, प्रभागनिहाय आरक्षण आणि प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. निवडणूक आचारसंहिता जाहीर करण्यात आली असून, प्रत्यक्ष निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास मंगळवारपासून सुरुवात होणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी अद्याप कोणत्याच राजकीय पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही, तर महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवायची की महाविकास आघाडी म्हणून एकत्रित निवडणूक लढवायची यावर देखील अद्याप राजकीय पक्षांनी स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नाही. अशातच निवडणूक अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार असल्याने राजकीय ज्वर आता आणखी वाढणार आहे.
निवडणूक कामकाजासाठी एकूण 22 विविध कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. त्यासाठी 15 नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय, निवडणूक निर्णय अधिकारीस्तरावर देखील 22 कक्षांसाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नेमण्यात आले आहेत. त्यामुळे निवडणूक व्यवस्थापन अधिक प्रभावी आणि समन्वयाने राबवले जाणार आहे. उमेदवारांच्या सोयीसाठी पुणे महापालिकेने विविध विभागांकडील ‘ना-हरकत व थकबाकी प्रमाणपत्र’ मिळविण्यासाठी संगणकप्रणाली उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत 2100 जणांनी यासाठी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारांना आता एकाच ठिकाणी किंवा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून ही प्रमाणपत्रे मिळविता येणार आहेत. तसेच प्रचारासाठी आवश्यक असलेले वाहन परवाने, तात्पुरती प्रचार कार्यालये, कोपरा सभा, जाहीर सभा यांसारख्या परवान्यांसाठी प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यालयात ‘एक खिडकी कक्ष’ स्थापन करण्यात आली आहे. ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी संगणक प्रणालीसंदर्भातील कार्यवाही सुरू आहे.
160 विशेष पोलिस अधिकाऱ्यांची नियुक्ती
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस विभागाकडून सध्या 160 पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असून, याबाबत पोलिस प्रशासनाला कळविण्यात आले आहे. निवडणूक कालावधीत आवश्यकतेनुसार अतिरिक्त बंदोबस्तही तैनात केला जाणार आहे. मतदानप्रक्रियेसाठी मतदान केंद्राध्यक्ष तसेच मतदान अधिकारी क्रमांक 1, 2 आणि 3 अशा सुमारे 23 हजार कर्मचाऱ्यांचे नियुक्ती आदेश जारी करण्यात आले आहेत. सर्व प्रभागांमध्ये स्ट्राँग रूम, मतदान साहित्यवाटप व स्वीकृती केंद्रांची ठिकाणे निश्चित करण्याचे काम संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत सुरू आहे.
41 प्रभागांमध्ये 4002 मतदान केंद्र
पुणे शहरातील एकूण 41 प्रभागांमध्ये 4002 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली असून, अंतिम मतदार यादीच्या आधारे मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या तयार करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. 35 लाख 51 हजार 854 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाने सर्व पातळींवर नियोजन केले असून, निवडणूकप्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी महापालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मंगळवारपासून सुरू होणाऱ्या या प्रक्रियेमुळे शहरातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
निवडणुकीचे वेळापत्रक
उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी - 23 ते 30 डिसेंबर 2025 (सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत)
उमेदवारी अर्जांची छाननी - 31 डिसेंबर 2025
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक - 2 जानेवारी 2026 पर्यंत (दुपारी 3 वाजेपर्यंत)
निवडणूक चिन्हवाटप व अंतिम उमेदवारी प्रसिद्ध - 3 जानेवारी 2026
मतदान - 15 जानेवारी 2026 वेळ सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत.
मतमोजणी - 16 जानेवारी 2026
निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय-प्रभाग क्रमांक
प येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालय - 1, 2, 6 प नगररोड-वडगाव शेरी, क्षेत्रीय कार्यालय - 3, 4, 5 प शिवाजीनगर-घोले रोड क्षेत्रीय कार्यालय - 7, 12 प औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय - 8, 9
कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालय - 10, 11, 31 प ढोले-पाटील क्षेत्रीय कार्यालय - 13, 14
हडपसर क्षेत्रीय कार्यालय - 15, 16, 17 प वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यलाय - 18, 19, 41
बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय - 20, 21, 26 प भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय - 22, 23, 24
कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय - 25, 27, 28 प वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय - 29, 30, 32
सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय - 33, 34, 35 प धनकवडी क्षेत्रीय कार्यालय - 36, 37, 38
कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय - 39, 40