पुणे: पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या सलग दुसऱ्या दिवशी इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरण्यास पाठ दाखवली. बुधवारी आम आदमी पक्षाच्या सिंहगड रोड कार्यालयांतर्गत आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर यांनी ढोल-ताशांच्या गजरात तीन उमेदवारी अर्ज दाखल केले. तर, दुसऱ्या दिवशी 3 हजार 551 नामनिर्देश अर्जांची विक्री झाली. पहिल्याच दिवशी म्हणजे मंगळवार (दि. 23) एकूण नामनिर्देशन 2886 फॉर्म विक्री झाली होती.
महानगरपालिकेचे पडघम वाजू लागले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. दुसऱ्या दिवशीही नामनिर्देशन फॉर्मची सर्वांत जास्त विक्री झाली. सर्वांत जास्त अर्ज विक्री ही हडपसर- मुंढवा कार्यालयातून झाली. या कार्यालयातून सर्वाधिक 429 फॉर्म, तर सर्वांत कमी अर्ज विक्री ही कोंढवा- येवलेवाडी कार्यालयातून झाली. केवळ 88 फॉर्मची विक्री बुधवारी झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशीही अर्ज भरण्यास कोणत्याही पक्षाच्या उमेदवारांनी उत्साह दाखवला नाही.
येरवडा-कळस-धानोरी, नगर रोड-वडगाव शेरी, कोथरूड-बावधन, औंध-बाणेर, शिवाजीनगर-घोले रोड, ढोले-पाटील रोड, हडपसर-मुंढवा, वानवडी-रामटेकडी, बिबवेवाडी, भवानी पेठ, कसबा-विश्रामबागवाडा, वारजे-कर्वेनगर, सिंहगड रोड, धनकवडी-सहकारनगर तसेच कोंढवा-येवलेवाडी या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उमेदवारांसाठी नामनिर्देशन अर्ज स्वीकारले जात आहेत.
शिवसेना-मनसे एकत्र आल्याने त्याचा उत्साह आज पुण्यात दिसून आला, तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी अद्याप चर्चा सुरू असून, गुरुवारी याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. भाजपची कोअर कमिटीची बैठक पार पडली असून, अद्याप जागावाटपावर एकमत झालेले नाही. भाजप शुक्रवारी पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता असल्याने यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यास वेग येण्याची शक्यता आहे.
1 हजार 779 जणांना मिळाले ‘एनओसी’
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महापालिकेचे ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. आत्तापर्यंत 2 हजार 938 जणांनी हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज केले आहेत. यातील तब्बल 1 हजार 779 जणांना ‘ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे, तर 94 जणांनी अर्धवट अर्ज भरले आहेत.