पुणे: आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शहरात मोठी तयारी सुरू केली असून, इच्छुकांच्या मुलाखतींनी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बऱ्याच कालावधीनंतर निवडणुका होत असल्याने इच्छुकांनी पक्षाच्या कार्यालयाबाहेर शुक्रवारी (दि. 19) शक्तिप्रदर्शन करीत मुलाखतींचा सिलसिला पार पडला.
इच्छुकांच्या मुलाखत प्रक्रियेसाठी पक्षाने एक विशेष समिती स्थापन केली असून, यात मनसेचे नेते बाबू वागस्कर, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, किशोर शिंदे, हेमंत संभुस, गणेश सातपुते, बाळाभाऊ शेडगे यांच्यासारखे प्रमुख नेते मार्गदर्शकाची भूमिका बजावत इच्छुकांच्या मुलाखती घेत होते. दरम्यान, या वेळी शहरातील विविध प्रभागांतून आलेल्या काही इच्छुकांच्या चेहऱ्यावर आनंद, तर काहींचे चेहरे चिंताग््रास्त दिसले. तब्बल 532 इच्छुकांचे अर्ज आले होते, त्या सर्वांच्या मुलाखती उशिरापर्यंत सुरू होत्या.
प्रत्येक उमेदवाराला मुलाखतीसाठी पुरेसा वेळ देण्यात आला होता. उमेदवारांची निवड करताना फक्त निष्ठाच नाही, तर त्यांची वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक पार्श्वभूमी आणि त्यांनी पक्षात आत्तापर्यंत दिलेले योगदान याची कसून चौकशी करण्यात येत होती. तसेच, उमेदवाराचा प्रभागातील जनसंपर्क, भौगोलिक माहिती आणि प्रशासकीय कामकाजाचे ज्ञान किती आहे, यावरही समितीने भर दिल्याचे पाहायला मिळाले. उमेदवारांची निवड करताना त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी देखील तपासली जात होती.
इच्छुक उमेदवारांच्या कामकाजाची, मुलाखतीची आणि व्हिजनबद्दलची माहिती घेऊन सविस्तर अहवाल तयार केला जाणार असून, त्यांची माहिती वरिष्ठांना सादर केली जाणार आहे, असे मनसेच्या नेत्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या मुलाखतींचा सर्व अहवाल अंतिम निर्णयासाठी पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याकडे पाठविला जाईल आणि त्यानंतरच उमेदवारांची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. महापालिकेच्या रणधुमाळीत मनसे यंदा पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे या सर्व हालचालींवरून स्पष्ट होत असल्याचे दिसून आले.
युवावर्ग, महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुलाखतीच्या प्रक्रियेत विशेषतः युवावर्ग आणि महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ असलेले कार्यकर्ते आणि महिला पदाधिकारी आपल्या कार्याचा अहवाल, सोशल मीडियावरील कामगिरी आणि आंदोलनांचे रेकॉर्ड घेऊन मुलाखतीसाठी आल्या होत्या. आता ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे बदललेली परिस्थिती लक्षात घेऊन यंदा आमचा मोठा विजय होईल, असा विश्वास अनेक इच्छुकांनी व्यक्त केला.