पुणे : उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अखेरचे दोन दिवस उरले असतानाच पुण्यात महाविकास आघाडी व महायुतीचे चित्र अजूनही अस्पष्टच आहे. रविवारी पुन्हा महाविकास आघाडीत बिघाडी झाली, तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याचे दिसून आले.
त्यानुसार आता काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र आली आहे. तर, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीची आज घोषणा होण्याची शक्यता आहे. याशिवाय महायुतीत भाजप-शिवसेना एकत्र लढणार, हेसुद्धा स्पष्ट होऊ शकले नाही.
महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. मात्र, कोण कोणासोबत एकत्र येऊन निवडणूक लढणार? हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. शनिवारी पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी महाविकास आघाडी एकत्र येऊन निवडणूक लढविणार असल्याचे सांगत जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला होता. मात्र, शनिवारी रात्रीच पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची एकत्र बैठक झाली. या बैठकीत जागा वाटपासह कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची, याबाबत चर्चा झाल्याचे समजते. त्यानुसार सोमवारी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीची घोषणा होण्याची शक्यता आहे. दोन्ही राष्ट्रवादीचे सूत जुळल्याने परिणामी रविवारी महाविकास आघाडीतील काँग्रेस व ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या बैठकीला पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दांडी मारली.
बैठकीला उपस्थित राहणारे संबंधित पदाधिकारी आजारी असल्याचे कारण देण्यात आले. मात्र, हा राजकीय कट असल्याची चर्चा रंगली होती. त्यामुळे काँग्रेस व ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा झाली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीत आली नाही, तर शिवसेना आणि काँग्रेस अन्य मित्रपक्षांसह ही निवडणूक एकत्र लढविणार असल्याचे निश्चित केले. त्यानुसार १०० जागा काँग्रेसला देण्यात येणार आहेत. त्यामधील ८५ जागा काँग्रेस स्वत: लढविणार असून, उर्वरित पंधरा जागा वंचित बहुजन आघाडीला देण्यात येणार आहेत. तसेच शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या ६५ जागांपैकी शिवसेना २० ते २५ जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला देणार असल्याचे सांगण्यात आले. त्याबाबत दोन्ही पक्षांमध्ये एकमत झाले आहे. काँग्रेस लढवत असलेल्या काही मतदारसंघांतील जागांवर शिवसेनेकडून दावा करण्यात आला आहे. अशा दहा जागांबाबतचा निर्णय शिवसेना नेते सचिन अहिर आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या बैठकीत होणार आहे.
एकीकडे महाविकास आघाडीत गोंधळ सुरू असतानाच भाजप-शिवसेना यांच्यातील जागा वाटपाचा तिढा रविवारी उशिरापर्यंत सुटलेला नव्हता. शिवसेना २५ जागांवर अद्यापही ठाम असल्याचे सांगण्यात येत आहे. यासंबंधीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत. त्यामुळे युती राहणार की नाही, याबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहेत.
मविआत राष्ट्रवादी काँग्रेस आली नसली तरी शिवसेना आणि काँग्रेस ही निवडणूक एकत्र लढविणार आहे. आघाडीच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना दूरध्वनी करण्यात आले. मात्र, त्यांचे दूरध्वनी संपर्क क्षेत्राच्या बाहेर होते. शिवसेना आणि काँग्रेस आघाडीच्या याद्या सोमवारी तयार होतील. महाविकास आघाडीत यायचे की नाही, याचा निर्णय तातडीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यावा, असे काँग्रेस शहारध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सांगितले.