पुणे: महापालिका निवडणुकीत यंदा राजकीय समीकरणांसोबतच कौटुंबिक नात्यांतील उमेदवारांची रिंगणात उतरलेली गर्दी चर्चेचा विषय ठरली. पती-पत्नी, आई-मुलगा, भाऊ-भाऊ, बाप-लेक, सासरा-जावई, नणंद-भावजय आणि मामा-भाचे अशा अनेक कौटुंबिक जोड्यांनी वेगवेगळ्या प्रभागांमध्ये निवडणूक लढवली. काहींनी विजयाचा पताका फडकावली तर काहींना पराभवाचा सामना करावा लागला.
भाजपच्या पती-पत्नी जोडीला यश, तर काही ठिकाणी दोघांनाही अपयश आले. विमाननगर-लोहगाव येथील ऐश्वर्या पाटील आणि खराडी-वाघोली येथील सुरेंद्र पठारे हे दोघेही विजयी झाले असून, सभागृहात भाजपची उपस्थिती मजबूत झाली. मात्र, येरवडा-गांधीनगरमधील संजय भोसले आणि पुणे स्टेशन-जय जवाननगर येथील त्यांच्या पत्नी अश्विनी भोसले, तसेच काशेवाडी-डायस प्लॉटमधील अविनाश व इंदिरा बागवे या पती-पत्नींना पराभव स्वीकारावा लागला. आई-मुलगा लढतीत संमिश्र निकाल लागला. वानवडी-साळुंके विहार येथून प्रशांत जगताप (काँग््रेास) विजयी झाले, मात्र त्यांच्या आई रत्नप्रभा जगताप यांना मतदारांचा कौल मिळाला नाही. त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. नऱ्हे-वडगाव बुद्रुक-धायरी येथील राधिका व नीलेश गिरमे, तसेच रविवार पेठ-नाना पेठ व कसबा गणपती परिसरातून निवडणूक लढवणाऱ्या प्रतिभा व प्रणव धंगेकर या आई-मुलगा जोड्यांना दुहेरी पराभवाला सामोरे जावे लागले.
भाऊ-भाऊ जोडीला मात्र मतदारांची पसंती मिळाली. रामबाग कॉलनी-शिवतीर्थनगर येथील हर्षवर्धन मानकर (राष्ट्रवादी काँग््रेास) आणि शनिवार पेठ-महात्मा फुले मंडई येथील राघवेंद्र मानकर (भाजप) हे दोन्ही भाऊ विजयी होऊन सभागृहात पोहोचले. बाप-लेक राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाकडून वेगवेगळ्या प्रभागात लढत होते. यामध्ये मुलाला विजय मिळाला तर वडिलांचा पराभव झाला. अप्पर सुपर इंदिरा नगरमधून मुलगा प्रतीक याला विजय मिळवता आला. तर बालाजीनगर आंबेगाव कात्रज प्रभागातून वडील प्रकाश कदम यांना पराभवाचा सामना करावा लागला. तर बालाजीनगर आंबेगाव कात्रज प्रभागातून शिवसेना (उबाठा)चे वसंत मोरे व रूपेश मोरे हे कोंढवा बु. येवलेवाडी प्रभागातून निवडणूक लढवत होते. या पिता-पुत्राला जनतेचा कौल मिळाला नाही.
नऱ्हे- वडगाव बुद्रुक- धायरी प्रभागातून राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाकडून लढणारे बापूसाहेब पोकळे यांचा पराभव झाला, तर त्याचा प्रभागात भाजपकडून लढणारे त्यांचे नातेवाईक राजाभाऊ लायगुडे हे विजयी झाले. नवी पेठ-पर्वती प्रभागातून राष्ट्रवादी काँग््रेासच्या अक्षदा गदादे यांना पराभवाचा सामना करावा लागला, तर जनता वसाहत हिंगणे खुर्द प्रभागातून लढणार त्यांची नणंद प्रिया गदादे विजयी झाल्या. तर काशेवाडी-डायस प्लॉट प्रभागातून काँग््रेासकडून रफिक शेख यांनी विजयावर शिक्कामोर्तब केला, तर याच प्रभागातून त्यांचे मामेभाऊ दिलशाद शेख हे पराभूत झाले. खडकवासला शिवणे-धायरी प्रभागातून राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाच्या अनिता इंगळे आणि त्यांच्या नणंद रेश्मा बराटे या कर्वेनगर-हिंगणे होम कॉलनी प्रभागातून भाजपतर्फे निवडणूक लढवत विजयी झाल्या. कोरेगाव पार्क घोरपडी मुंढवा भागात काका आणि पुतण्यात थेट लढत झाली. यामध्ये पुतण्या उमेश गायकवाड याने काका बंडू गायकवाड यांना धोबीपछाडत विजय मिळविला.
सासू- सुनांचा थेट कारागृहातून विजय
शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या रविवार पेठ नाना पेठ प्रभागातून लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर ही सासू-सुनेची जोडी विजयी झाली आहे. या सासू-सुनांना कारागृहातून निवडणूक लढविली. त्या विजयी झाल्या असल्या तरीही सभागृहात कधी दिसणार हा प्रश्न आहे.