स्थानिक निवडणुका जाहीर; पण पुणे महापालिका आचारसंहितेबाहेर Pudhari
पुणे

Pune Municipal Election Code of Conduct: स्थानिक निवडणुका जाहीर; पण पुणे महापालिका आचारसंहितेबाहेर

विकासकामे, प्रकल्प आणि निविदा प्रक्रिया पूर्ववत सुरू राहणार; आयुक्त नवल किशोर राम यांचे स्पष्टीकरण

पुढारी वृत्तसेवा

पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम अखेर वाजले असून, राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीची घोषणा मंगळवारी केली. मात्र, पुणे महापालिकेसाठी अद्याप कोणतीही अधिसूचना जाहीर झालेली नसल्याने शहरात आदर्श आचारसंहिता लागू होणार नसल्याचे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले आहे.(Latest Pune News)

मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली. या परिषदेत फक्त नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांबाबतचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, महापालिकांच्या निवडणुकांबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे पुणे महापालिकेतील विविध विकासकामे, प्रकल्पांची मंजुरी, निविदा प्रक्रिया आणि दैनंदिन प्रशासकीय निर्णय, यांवर आचारसंहितेची कोणतीही बंधने नाहीत, असे आयुक्तांनी सांगितले.

निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी पुणे शहरात आचारसंहिता लागू होणार असल्याच्या चर्चांना चांगलाच ऊत आला होता. परंतु, आयुक्त राम यांनी राज्य सचिवांशी थेट संपर्क साधून याबाबत स्पष्टता घेतली आणि “पुणे महानगरपालिका क्षेत्रासाठी सध्या आचारसंहिता लागू नाही,” असे स्पष्ट सांगितले. त्यामुळे नागरिक आणि प्रशासन या दोघांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

विकासकामे सुरूच राहतील : आयुक्त

पुणे महापालिका हद्दीसाठी निवडणुकीची अधिसूचना अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाची सर्व विकासात्मक कामे पूर्ववत सुरू राहतील. महापालिका निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतरच आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे सध्या सुरू असलेली नदी सुधारणा, पायाभूत सुविधा, घनकचरा व्यवस्थापन आणि मालमत्ता करवसुलीशी संबंधित कामे निर्बंधांशिवाय पार पडू शकतील.

अभय योजनेचा अभ्यास सुरूच

महापालिकेच्या कर विभागाकडून मिळकत थकबाकीदारांसाठी अभय योजना लागू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. आचारसंहिता लागू नसल्याने या योजनेचा सखोल अभ्यास करण्यासाठी प्रशासनाला अधिक वेळ मिळणार आहे. “सर्व बाजूंनी विचार करूनच ही योजना राबविण्यात येईल,” असेही आयुक्त राम यांनी सांगितले.

नागरिकांना दिलासा

राज्य निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पुण्यात अनेक ठिकाणी आचारसंहिता लागू होईल का? या चर्चेला वेग आला होता. नागरिकांमध्ये प्रशासनाची कामे थांबतील, अशी चिंता निर्माण झाली होती. परंतु, आयुक्तांच्या स्पष्टीकरणानंतर या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, विकासकामे नियोजित वेळेत पार पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT