पुणे: ‘मी केवळ मॅनेजर आहे. माझ्या हातात काहीच नाही. निवडणूक निर्णय अधिकारी स्वतंत्र आहेत. त्यांनी घेतलेल्या कोणत्याही निर्णयावर मी हस्तक्षेप करू शकत नाही. नागरिकांकडून तक्रारी आल्यासच कारवाई करणे माझ्या अधिकारात आहे,’ असे सांगत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पुणे महापालिका निवडणुकीतील प्रशासनाच्या गोंधळलेल्या कारभाराची आणि अपुऱ्या नियोजनाची स्पष्ट कबुली दिली.
पुणे महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाल्यापासून प्रशासनाचे नियोजन अक्षरशः कोलमडले आहे. उमेदवारी अर्ज भरण्यापासून अर्ज छाननी आणि माघारीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर गोंधळाचे चित्र दिसून आले. निवडणूक निर्णय अधिकारी (आरओ) माहिती देत नसल्याचे कारण पुढे करीत निवडणूक विभागाकडून वेळेवर अधिकृत व अद्ययावत माहिती जाहीर केली जात नव्हती. आदर्श आचारसंहिता लागू असताना तिचे काटेकोर पालन करणे, ही राजकीय पक्षांसह महापालिका प्रशासनाची जबाबदारी असताना प्रत्यक्षात त्याकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. एका उमेदवारांकडून महापालिकेच्या मालकीच्या इमारतींचा वापर करून प्रचार यंत्रणा चालवली जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत.
निवडणूक प्रक्रियेत गंभीर चुका झाल्याचेही निदर्शनास आले आहे. दोन उमेदवारांच्या यादीतील क्रम चुकीचा असून, प्रभाग क्रमांक 27 (नवी पेठ-पर्वती) येथील राष्ट्रवादी काँग््रेास (शरद पवार गट) उमेदवार अनिकेत क्षीरसागर यांच्या उमेदवारी अर्जात बदल करण्यात आला. निवडणूक आयोगाने 3 जानेवारी रोजी पहिली अधिकृत उमेदवार यादी जाहीर केली होती. या यादीत नियमांनुसार उमेदवारांचा क्रम निश्चित करण्यात आला होता. मात्र, त्याच दिवशी दुसरी यादी तयार करून ती 7 जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली. विशेष म्हणजे, या बदललेल्या यादीवरही 3 जानेवारीचाच दिनांक आहे. कोणताही लेखी खुलासा, कारण किंवा नियमांचा आधार न देता पहिल्या यादीत बदल केल्याचा आरोप क्षीरसागर यांनी केला आहे.
हडपसर परिसरातही अशाच प्रकारची घटना समोर आली होती. तसेच, आचारसंहितेचा भंग करीत महापालिकेच्या विद्युत खांबांवर उमेदवारांच्या जाहिराती झळकत असतानाही पालिका प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही. महापालिकेच्या काही इमारतींचा ताबा काही उमेदवारांनी घेतला असून, या ठिकाणाहून निवडणूक प्रचार यंत्रणा चालवली जात असून, जेवणावळीही आयोजित केल्या जात आहेत. आचारसंहिता काळात महापालिकेच्या इमारतींचा असा वापर करणे नियमबाह्य असतानाही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.
माध्यमांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आरोग्य केंद्राला दिवसा टाळे लावून रात्री वापरण्याचा प्रकार सुरू करण्यात आला आहे. मात्र, महापालिका प्रशासन किंवा निवडणूक विभागाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.