पुणे: पुणे महानगरपालिकेच्या नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी सुरू असलेली राजकीय रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली असून, गेल्या काही आठवड्यांपासून शहरात गाजत असलेले झंझावाती रोड शो, भव्य रॅली, पदयात्रा आणि कोपरा सभा आज मंगळवारी (दि. 13) सायंकाळी 5.30 वाजता थांबणार आहेत. त्यानंतर शहरात मतदारांशी ‘थेट संपर्क’ हा शेवटचा टप्पा सुरू होईल. यंदाची निवडणूक ही केवळ सत्तेसाठीची लढाई नसून, बदललेल्या राजकीय समीकरणांची, नेत्यांच्या प्रतिष्ठेची आणि पक्षांतर्गत बंडखोरीची खरी कसोटी ठरणार असल्याचे चित्र राजकीय वर्तुळात दिसत आहे. आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे मैदानात उतरणार आहेत.
महापालिकेसाठी येत्या गुरुवारी (दि. 15) पुणेकर आपला कौल देणार आहेत. यंदा दोन जागा बिनविरोध झाल्यामुळे 163 नगरसेवक पदांसाठी मतदान होणार असून, त्यासाठी 1 हजार 149 उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारांची प्रचंड संख्या आणि बहुकोनी लढतीमुळे प्रत्येक प्रभागात चुरशीचा सामना होणार आहे. या निवडणुकीचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे राज्यातील बदललेल्या राजकीय स्थित्यंतरांचे प्रतिबिंब थेट पुण्याच्या प्रभागांमध्ये उमटले आहे. राज्यात एकत्र सत्तेत असलेले भाजप, राष्ट्रवादी काँग््रेास (अजित पवार गट) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) हे पक्ष मात्र पुणे महापालिकेच्या रणांगणात एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत.
त्यामुळे ही निवडणूक केवळ स्थानिक विकासापुरती मर्यादित न राहता, राज्यातील सत्ता समीकरणांवरही परिणाम करणारी ठरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांवर विशेष लक्ष केंद्रीत करत शहरात तळ ठोकून प्रचारात आघाडी घेतली. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग््रेास (अजित पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग््रेास (शरदचंद्र पवार गट) एकत्रितपणे निवडणूक लढवत असून, भाजपने मात्र कोणत्याही पक्षाशी युती न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत जोरदार प्रचार केला आहे. दुसरीकडे काँग््रेास, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या तीन पक्षांनी एकत्र येत नवे आघाडीचे समीकरण उभे केले आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत प्रत्येक प्रभागात वेगवेगळी राजकीय गणिते तयार झाली असून मतदारांनाही पर्यायांची मोठी चाचपणी करावी लागत आहे.
उमेदवारी वाटपावरून जवळपास सर्वच प्रमुख पक्षांमध्ये असंतोषाचे वातावरण पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी ‘निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले गेले’ असा आरोप पुढे आला असून, ऐनवेळी पक्षात प्रवेश करणाऱ्यांना संधी दिल्यामुळे जुने कार्यकर्ते नाराज झाले. याचा परिणाम म्हणून अनेक प्रभागांत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांसमोरच स्वकीय बंडखोर उभे असल्याने लढती रंगतदार झाल्या आहेत.
प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कार्यकर्त्यांची पळवापळवीही शिगेला पोहोचली होती. वजनदार नेते, माजी नगरसेवक आणि स्थानिक प्रभावी कार्यकर्त्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी पक्षांमध्ये चढाओढ लागली. त्यामुळे अनेक प्रभागांतील समीकरणे शेवटच्या क्षणापर्यंत बदलत राहिली. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी प्रचार थांबत असताना पुण्यातील राजकीय वातावरण अत्यंत तापलेले असून, प्रत्येक पक्ष आणि उमेदवार शेवटच्या क्षणापर्यंत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. मतदारांचा कौल नेमका कुणाला हे येत्या 15 तारखेला स्पष्ट होणार आहे. यंदाची पुणे महापालिकेची निवडणूक राज्यातील राजकारणालाही नवे संकेत देणारी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.